लोंढे न थांबविल्यास पनवेलमध्ये आतंकवादी अड्डे,राज ठाकरेंनी दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:38 AM2018-05-18T02:38:20+5:302018-05-18T02:38:20+5:30
राज्यात रोज ४८ रेल्वेमधून परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. पनवेल टर्मिनसचे महत्त्व वाढत असून परप्रांतीयांचे लोंढे न थांबविल्यास या परिसरात आतंकवाद्यांचे अड्डे तयार होतील, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
पनवेल : राज्यात रोज ४८ रेल्वेमधून परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. पनवेल टर्मिनसचे महत्त्व वाढत असून परप्रांतीयांचे लोंढे न थांबविल्यास या परिसरात आतंकवाद्यांचे अड्डे तयार होतील, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. परप्रांतीयांची घुसखोरी थांबली पाहिजे. रोज परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत धडकत आहेत. त्यांना वेळेत रोखले पाहिजे. पनवेलचे महत्त्व वाढत आहे. रेल्वे टर्मिनसमुळे भविष्यात येथेही परप्रांतीयांची संख्या वाढेल. या परिसरामध्ये आतंकवादी अड्डे तयार होण्यास वेळ लागणार नाही. परप्रांतीयांचे असेच लोंढे जर पनवेलमध्ये येत राहिले तर या ठिकाणी नवीन झोपडपट्ट्या तयार होऊन बंदुकी बनविण्याचे कारखाने तयार होतील, आणि त्यानंतर पनवेलकर काहीही करू शकणार नाहीत, असेदेखील ठाकरे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून पक्षवाढीसाठी काम करावे. एकमेकांच्या तक्रारी करत बसला तर घरचा रस्ता मोकळा असल्याचा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. बोगस मतदार याद्या उखडून काढा, जनतेच्या घराघरांपर्यंत जाऊन त्यांची मतदार यादीमध्ये नोंद आहे की नाही, हे तपासून पाहिले नाही तर लोक तुमच्याकडे काय अपेक्षा ठेवणार? जनतेसाठी काम करायला शिका आणि मग जनतेकडून अपेक्षा बाळगा, असा सल्लाही त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिला. ज्येष्ठ नागरिक संघ येथे एका कार्डिएक रु ग्णवाहिकेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय काशिद, उप जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, उप तालुकाध्यक्ष सूरज गायकर, प्रभारी पनवेल शहराध्यक्ष केदार सोमण, नवीन पनवेल शहराध्यक्ष यतीन देशमुख, कळंबोली शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, मनसे विधानसभा सचिव प्रतीक वैद्य आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.