रखडलेल्या वेतनासाठी महापालिकेवर थाळीनाद मोर्चा, मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:59 AM2019-11-29T02:59:36+5:302019-11-29T03:01:27+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येत्या तीन आठवड्यात कामगारांचा किमान वेतन फरक देण्याची मागणी महापालिका प्रशासनाने मान्य केली असून लेखी आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विभागात काम करणाºया कंत्राटी कामगारांना फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार किमान वेतन फरक मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. अर्थसंकल्पात तरतूद असताना तसेच सदर प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळालेली असतानाही कामगारांचे १४ महिन्यांची किमान वेतन रक्कम अद्याप कामगारांना मिळाली नाही. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेतर्फे महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाला लेखी पत्र दिले असून यामध्ये कामगारांना १४ महिन्यांचा फरक कंत्राटदारामार्फत अदा करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले आहे.
मोर्चात मनसेचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, आप्पासाहेब कोठुळे, राजेश उज्जैनकर, अमोल आयवळे, अभिजित देसाई, गजानन ठेंग, संजय सुतार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कंत्राटी कामगार सहकुटुंबासह उपस्थित होते.