ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भेमधील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:38 AM2019-11-23T00:38:57+5:302019-11-23T00:39:03+5:30
पाठपुराव्याला यश; तीन महिन्यांत काम सुरू होणार
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हजारो नागरिक शुक्रवारी स्टेशनसमोर जमा झाले होते. रहिवाशांमधील असंतोषाची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
नवी मुंबईमधील सर्वाधिक वाहतूककोंडी तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये होत आहे. रेल्वे स्टेशनच्या समोर दिवसभर चक्का जामची स्थिती असते. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून आतापर्यंत १५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनीही केली होती. प्रशासनाकडून हा प्रश्न मार्गी लावला जात नसल्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. जमिनीवर बसून आंदोलन केले होते. यानंतर शुक्रवारी तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सकाळी परिसरातील हजारो नागरिक स्टेशनसमोर एकत्र आले होते. नागरिकांमधील असंतोषाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहर गतिशील योजनेअंतर्गत या रोडवर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रशासनाने दिलेले आश्वासन
ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर तुर्भे स्टोअर्स येथे होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा खोळंबा होत आहे. तसेच वाहतूककोंडीमुळे स्थानिक नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत २० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने या रोडवर उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले आहे. या कामाची फेरनिविदा करणेबाबत प्रस्ताव महासभेत सादर केला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासनात म्हटले आहे.
तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर वारंवार अपघात होत आहेत. वाहतूककोंडीही होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी आम्ही केली होती. शुक्रवारी रास्ता रोको करण्यात येणार होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
- सुरेश कुलकर्णी, नगरसेवक