दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन भागीदारीत बांधणार बुलेट ट्रेनचा ठाणे डेपो, स्पर्धक कंपन्यांपेक्षा निम्म्या दराची ९४५ कोटींची निविदा मंजूर
By नारायण जाधव | Published: December 27, 2023 06:54 PM2023-12-27T18:54:14+5:302023-12-27T18:54:47+5:30
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीनजीकच्या भारोडी आणि अंजूर गावाच्या हद्दीतील तब्बल ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्यात येत आहे.
नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा राज्यातील एकमेव असलेला देखभाल-दुरुस्ती डेपो बांधण्याचे कंत्राट अखेर दिनेशचंद्र आर अगरवाल आणि दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन यांनी संयुक्त भागीदारीत जिंकले आहे. त्यांची सर्वात कमी दराची ९४५ कोटींची निविदा नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने मान्य केली आहे. येत्या साडेपाच वर्षांत या डेपोचे बांधकाम पूर्ण करण्याची अट आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीनजीकच्या भारोडी आणि अंजूर गावाच्या हद्दीतील तब्बल ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्यात येत आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने डिसेंबर २०२२ मध्ये मागविलेल्या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. ज्या चार कंपन्यांनी हा डेपो बांधण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे, त्यामध्ये दिनेशचंद्र आर अगरवाल-दिल्ली मेट्रो रेल कार्पोरशन, केईसी इंटरनॅशनल, लार्सन अँड टुब्रो आणि एससीसी-प्रेमको यांचा समावेश होता.
डेपोत या कामांचा असणार समावेश
कामाच्या व्याप्तीमध्ये ठाणे डेपोची रचना आणि बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामध्ये रस्ते, गटारे, इमारतींचे बांधकाम, तपासणी शेड, गाड्यांची दैनंदिन तपासणी, त्या धुण्यासाठी जलाशयांची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय जपान येथून मागविलेली ८०० हून अधिक उपकरणे बसवून त्यांची प्रत्यक्षात तपासणी करून रीतसर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यावर बुलेट ट्रेनची सुरक्षितता अवलंबून आहे. त्यानंतरच हा डेपो कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रकाश देखभालीच्या कामासाठी या डेपोमध्ये सुरुवातीला ४ इन्स्पेक्शन लाईन्स (भविष्यात ८), १० स्टॅबलिंग लाईन्स (भविष्यात ३१), इन्स्पेक्शन बे आणि वॉशिंग प्लांट यांचा समावेश असणार आहे
कामाच्या दर्जाबाबत राहणार प्रश्नचिन्ह
डेपो बांधण्यासाठी स्पर्धेत उतरलेल्या कंपन्यांच्या निविदांची तांत्रिक मूल्यमापन तपासणी करून नंतर आर्थिक बोली उघडल्या असता सर्वांत कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. जी दिनेशचंद्र आर अगरवाल -दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरशनची ९४५ कोटींची हाेती. तर लार्सन अँड टुब्रोने १५७० कोटी आणि एससीसी-प्रेमको यांनी २१०० कोटींची निविदा भरली होती. तर केईसी यांची निविदा अपात्र ठरविण्यात आली.
नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने मान्य केलेली निविदा आणि इतर स्पर्धकांनी लावलेल्या बोलीत जवळपास दुप्पट फरक आहे. एल ॲन्ड टी सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीनेही १५७० कोटींची निविदा भरली होती. यामुळे डेपोच्या बांधकामांचा दर्जा कसा राहील, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कारण इतर साहित्य जापानमधून येणार आहे.
आगासन येथे २२ हेक्टरवर ठाणे स्थानक
बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकासाठी २२ हेक्टर जागेचे संपादन केले आहे. यात ठाणे पालिका क्षेत्रातील खासगी मालकीची जमीन १८ हेक्टर ८ आर ८१ चौ. मीटर, मध्य रेल्वेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ. मीटर, राज्य शासनाच्या दोन हेक्टर ३२ आर १० चौ. मीटर जमिनीचा समावेश आहे. यासाठी आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शीळ व देसाई आदी ठिकाणांवरील अतिक्रमणे काढली आहेत.