ठाणे : नवी मुंबई महापालिकेच्या बसगाड्या ठाण्यात धावताना नियमांचे उल्लंघन करतात. ठाणे महापालिका बससेवेचे उत्पन्न प्रभावित करणाऱ्या या बेकायदा बसेसच्या ठाणे प्रवेशावर निर्बंध आणण्याची मागणी परिवहन समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी परिवहन सभेमध्ये केली. अनेक मुद्यांवर या सभेत गरमागरम चर्चा झाली. महापालिकांच्या बसेसचे प्रारंभीचे आणि अंतिम ठिकाण हे त्यांच्या महापालिका क्षेत्रातीलच असावे, असा नियम आहे. परंतु, नवी मुंबई महापालिकेची बोरिवली ते कोपरी ही बस कोपरीमधून निघाल्यानंतर ठाण्यातील अन्य ठिकाणांहून प्रवासी घेते. ही बाब बेकायदेशीर आहे. ठाणे परिवहनचे उत्पन्न प्रभावित करणारा हा प्रकार रोखण्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार करण्याची सूचना समितीच्या सदस्यांनी यावेळी केली. नवी मुंबई महापालिकेच्या बसेसमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सामान शुल्क आकारत नाही. प्रवासी याचीही तुलना करतात. त्यामुळे ठाणे परिवहननेही या शुल्कआकारणीचा फेरविचार करावा, असे मत सदस्यांनी मांडले. ठाणे परिवहनच्या प्रवाशांना विनासायास सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘व्हेअर इज माय बस?’ या मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, या उद्घाटनाची माहिती परिवहन व्यवस्थापकासह परिवहन समितीचे सभापती आणि सदस्यांनाही ऐनवेळी मिळाली होती. या मुद्यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. उद्घाटन सोहळ्याची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही, असा सवाल अनिल भोर यांनी केला. याशिवाय, परिवहनच्या अर्थसंकल्पात परिवहन सभापतींचा अभिप्राय समाविष्ट न केल्याबद्दलही त्यांनी आक्षेप नोंदवला. प्रशासन हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. उद्घाटन सोहळ्याची माहिती आयुक्तांनी मला ऐनवेळी दिली, असे परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील आक्षेप घेतला होता, असेही ते म्हणाले. राऊत यांनी याप्रकारावर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सदस्यांनी पुढील विषयांवर चर्चा सुरू झाली.ठाणे परिवहन प्रवाशांना पुरेशी सेवा देत नसल्याने शहरात बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करता येत नाही, असे तोंडी उत्तर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची धक्कादायक माहितीही सभेमध्ये परिवहन प्रशासनाने दिली. ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर रोडवर बेकायदेशीरपणे धावणाऱ्या खासगी बसगाड्या टीएमटीच्या थांब्यांवरून प्रवासी पळवतात. त्यामुळे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर परिणाम होतो. कोपरीतील स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर पोलिसांनी खासगी बसेसवर कारवाई केली. त्यानंतर, टीएमटीने या मार्गावर १० बसगाड्या सुरू केल्याने दिवसाकाठी ५० हजार रुपयांनी उत्पन्न वाढले. खासगी बसेसवरील कारवाईची गरज यातून अधोरेखित होत असल्याचे स्पष्ट करून सदस्यांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी केली. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात काही नवीन बसेस आल्या असून आणखी बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होणार असली, तरी अवैध प्रवासी वाहतूक रोखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी अवैध वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांची छायाचित्रे टिपून ते पुरावे प्रादेशिक परिवहन विभागाला देण्याची सूचना सदस्यांनी केली. पुरावे दिल्यानंतर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभागावर दबाव येईल, असे मत सदस्यांनी व्यक्त करून यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)
ठाण्यात ‘एनएमएमटी’ नको
By admin | Published: April 01, 2017 5:56 AM