ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच; विनय सहस्त्रबुद्धे यांनीही केला दावा
By नारायण जाधव | Published: March 6, 2024 07:35 PM2024-03-06T19:35:51+5:302024-03-06T19:36:08+5:30
एकेकाळी ठाणे आणि कल्याण हे लोकसभा मतदारसंघ एकसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघाचेच भाग होते.
नवी मुंबई: एकेकाळी ठाणे आणि कल्याण हे लोकसभा मतदारसंघ एकसंघ ठाणेलोकसभा मतदारसंघाचेच भाग होते. येथून भाजपचे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा होता. त्यामुळे तो आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी बेलापूर येथे पत्रकारांना सांगितले.
बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्यानंतर ते बोलत होते.
एकनाथ शिंदे गटाने ठाणे मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांना तो सोडणार काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे मतदारसंघ भाजपला का हवा, हे वारंवार सांगितले आहे. मात्र, तो कोणाच्या वाटेला गेला तरी येथून नरेंद्र मोदींचे हात बळकट करणारा उमेदवार निवडून येईल, असे ते म्हणाले. तर संजीव नाईक यांचेही नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहेे. त्यावर मत व्यक्त करताना सहस्त्रबुद्धे यांनी उमेदवार कोणीही असला तरी भाजपचा विजय नक्की आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले.
काँग्रेसच्या अनिता शेट्टी भाजपात
या कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी भाजपात केला. त्या नेरूळमधील मातब्बर काँग्रेस नेते संतोष शेट्टी यांच्या पत्नी आहेत.