दोन गटातील दुहीवर प्रचाराची जबाबदारी वाटपाचा उतारा; भाजपानं काढला तोडगा
By नारायण जाधव | Published: April 8, 2024 08:19 PM2024-04-08T20:19:03+5:302024-04-08T20:19:40+5:30
संदीप नाईकांना ऐरोली तर मंदा म्हात्रेंवर बेलापूरची जबाबदारी : ठाण्यातील मतदारसंघात नियुक्त्या
नवी मुंबई : महायुतीच्या उमेदवारांना त्या त्या शहरांतील विधानसभा मतदारसंघात असलेल्या भाजपातील दोन-तीन गटांतील दुहीचा फटका बसू नये, यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेर त्या त्या नेत्यांना विशिष्ट मतदारसंघाची जबाबदारीवाटपाचा शोधला आहे. यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या नवी मुंबईतील गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या पक्षांतील दोन आमदारांत असलेल्या मतभेदांचा प्रचारावर परिणाम होऊ नये, यासाठी दोन्ही गटांना जबाबदारी वाटून दिली आहे.
नव्या जबाबदारीनुसार ऐरोली विधानसभा मतदारसंघात पक्षाचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह प्रवक्ते अजित चव्हाण आणि माधुरी सुतार यांना नेमले आहे. तर बेलापूर विधानसभेची जबाबदारी आमदार मंदा म्हात्रेंसह सरचिटणीस विक्रांत पाटील, रामचंद्र घरत आणि दत्ता घंघाळे यांना दिली आहे.
शक्ती केंद्राच्या नेत्यांनी काय करावे
शक्ती केंद्र, असे नव्या जबाबदारींचे नामकरण केले असून त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय नेते नेमले आहेत. या नेत्यांनी काय करावे, याचे सविस्तर पत्रही बावनकुळे यांनी पाठवले आहे. यानुसार आपल्या विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्रासासाठी नियुक्त केलेल्या वक्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रवासाची तारीख, वेळ निश्चित करावी, संबधित वक्त्यांनी रोज किमान सात ते आठ सभा करून घ्याव्यात, नमो संवाद काॅर्नर सभा जास्तीत जास्त ४५ मिनिटे ते एका तासात संपेल, याची काळजी घ्यावी, भाषणात नरेंद्र मोदींचे काम, योजना या संदर्भातील मुद्दे असावेत. इतर मुद्यांवर सभा भरकटू देऊ नये, सभांची माहिती सोशल मीडिया हँडलवर प्रसारीत करावी. कॉर्नर सभांचे स्थळ त्वरीत सुपर वॅरिअर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांच्याशी बोलून निश्चित करावे, सभा संपताच त्वरीत तिची माहिती सरल ॲपवर अपलोड करावी, असे बजावण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही नेमले शक्ती केंद्र प्रमुख
नवी मुंबई प्रमाणेच मीरा-भाईंदरमध्ये सतीश निकम, श्वेता शालिनी, वर्षा भोसले यांना तर ओवळा-माजीवडा मतदारसंघात मनोहर डुंबरे, स्नेहा पाटील, ज्योत्स्ना हसनाळे यांना नेमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात संजय वाघुले, मृणाल पेंडसे कृष्णा भुजबळ यांना तर ठाणे मतदारसंघात माधवी केळकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि सुभाष काळे यांना नेमले आहे.