ठाणा नाका ते गोखले हॉल रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: January 25, 2017 05:05 AM2017-01-25T05:05:31+5:302017-01-25T05:05:31+5:30
पनवेल शहरातील ठाणा नाका ते गोखले हॉलपर्यंतच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे
पनवेल : पनवेल शहरातील ठाणा नाका ते गोखले हॉलपर्यंतच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडले आहेत तर काही ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, तसेच याठिकाणी पथदिव्यांचीही व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.
पनवेल नगरपरिषदेचे रु पांतर आता महापालिकेत झाले आहे. रस्ते अतिक्रमणमुक्त झाले असले तरी त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. शिवाय पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. या रस्त्यांवरून एनएमएमटीच्या बसेस, विद्यार्थी वाहतूक सेवा सुरु आहे. त्याचप्रमाणे रस्त्यालगत रुग्णालय व पोलीस ठाणे आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांची व नागरिकांची वर्दळ याठिकाणी असते. याच रस्त्यावर काही महिन्यापूर्वी एनएमएमटीच्या धडकेने एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. मात्र तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. रस्ते दुरुस्त करण्याऐवजी याठिकाणी अनेक गतीरोधक बसविण्यात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार, रिक्षा, दुचाकीवरून जाताना नागरिकांची हाडे चांगलीच खिळखिळी होतात.
खड्ड्यांमुळे धुळ सर्वत्र पसरत असल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतो. याठिकाणी छोटे मोठे अपघात तर रोजच घडतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही रस्त्याच्या कामाला अद्याप सुरु वात करण्यात आलेली नाही. त्यामुळे रास्ता रोको करण्याचा इशारा पनवेल शहरचे शेकाप चिटणीस प्रीतम म्हात्रे, प्रीती जॉर्ज, अनुराधा ठोकळ, सुरेखा मोहोकर यांनी दिला आहे. पनवेल नगरपालिका असताना हे काम मंजूर झाले आहे. त्याला आता वर्ष होत आहे. मात्र अजूनही काम सुरू झाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.