- कमलाकर कांबळे नवी मुंबई : ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तांची ३१ जुलै रोजी दोन वर्षांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तपदाच्या दोन्ही क्रिमी पोष्ट असल्याने, या पदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यासाठी अमराठी अधिकारी आघाडीवर असून, त्यांच्याकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे समजते. या चढाओढीत मराठी अधिकाºयांची मात्र गळचेपी होताना दिसत असून, या संदर्भात सरकार काय निर्णय घेतय, यावर या अधिकाºयांच्या नजरा खिळल्या आहेत.
येत्या ३१ जुलैपर्यंत सनदी अधिकाºयांच्या १५ टक्के बदल्या करण्याचे संकेत संबंधित विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. महत्त्वांच्या पदांवर वर्णी लागावी, यासाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाºयांमध्ये कमालीची चुरस लागली आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांचा आयुक्त पदाचा दोन वर्षांचा कालावधी येत्या ३१ जुलै रोजी पूर्ण होत आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना मुदतवाढ हवी असल्याने, ते पालकमंत्र्यांद्वारे मुख्यमंत्री दरबारी जोर लावत आहेत. दुसरीकडे राज्याच्या लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंह हे ठाणे पोलीस आयुक्तपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठी राज्यातील एक वरिष्ठ व वजनदार मंत्री आपली प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे समजते. त्यामुळे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कोणाला बसवावे, यावरून ठाकरे सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तपदासाठीही अमराठी अधिकाºयांत कमालीची चढाओढ सुरू असल्याचे समजते. त्यासाठी संबंधित अधिकाºयांकडून सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहे. मंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बदल्यांचा खुलेआम लिलाव सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी जयजीत सिंह, विनयकुमार चौबे व अशुतोष डुंबरे यांच्यात चढाओढ सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी वर्णी न लागल्यास बिपिन कुमार सिंह यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचाही पर्याय संबंधित मंत्र्याकडे उपलब्ध केल्याचे बोलले जात आहे. तर कोविडच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त संजय कुमार यांनाही मुदतवाढ मिळावी, यासाठी एक लॉबी सक्रिय झाल्याचे समजते.
इच्छित नियुक्तीसाठी सर्व पर्यायांचा अवलंब
१.ठाणे, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तपदाच्या जागा पोलीस विभागात क्रीमी पोस्टिंग म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे या जागेवर वर्णी लागावी, यासाठी प्रत्येक वेळी जोरदार रस्सीखेच असते. त्यासाठी साम, दाम व दंड या त्रिसूत्रांचा अवलंब केला जातो. या चढाओढीत अमराठी अधिकाºयांसमोर मराठी अधिकारी सर्वार्थाने कमी पडतात.२.त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला अनेकदा मर्यादा पडत असल्याने, त्यांना इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळत नाहीत, परंतु राज्यात सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे बदलीसाठी तीन ठिकाणी नैवेद्य चढवावे लागणार आहे.३.ही बाब मराठी अधिकाºयांच्या आवाक्याबाहेरची आहे. यातही अमराठी अधिकारी सरस ठरत असल्याने, मराठी अस्मितेचा नारा पिटणारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार नियुक्त्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.