पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाचवर्षीय चिमुरडीला विकण्यासाठी एक महिला ग्राहक शोधत असल्याची कुणकुण लागताच अवघ्या काही तासांतच ठाणे पोलिसांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले. मात्र, त्या चिमुरडीला तिच्या घटस्फोटित आईने दुसरे लग्न करण्यासाठी अवघ्या २० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर लिहून मैत्रिणीलाच दत्तक दिले. तसेच अटकेतील महिलेला पैशांची चणचण असल्याने तिने हे कृत्य केल्याची धक्कादायक बाब पुढे आली. ठाणे पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यात सहज अडकल्याने त्या महिलेवर आता तुरुंगाची हवा खाण्याची वेळ ओढवली आहे. त्या चिमुरडीचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य पोलिसांच्या तत्परतेने बचावले आहे.शोभा गायकवाड (५०) असे त्या चिमुरडीला विकणाऱ्या महिलेचे नाव आहे. ती कल्याण, कोळसेवाडी येथे वयोवृद्ध आई आणि मुलीच्या मुलासह राहते. याचदरम्यान, शोभा हिस एकेकाळची चेंबूरमधील रूम पार्टनर भेटली. त्या वेळी तिने दुसरे लग्न करायचे सांगितले. तर, पहिल्या पतीपासून झालेल्या पाचवर्षीय मुलीचा अडथळा येऊ नये, म्हणून शोभा हिच्याकडे २० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर लिहून दत्तक दिले आणि ती गुजरातमध्ये एकाशी लग्न करून निघून गेली. अवैधरीत्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दत्तकप्रक्रियेनंतर शोभा हिच्याकडे चिमुरडी राहत होती. दरम्यान, शोभाला पैशांची चणचण भासू लागल्याने तिने त्या मुलीला विक ण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ती काही दिवसांपासून ग्राहक शोधत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रवींद्र दौंडकर यांना मिळाली. त्यांनी, तातडीने बोगस ग्राहक तयार करून शोभा हिच्याशी फोनवर संपर्क साधला. त्या वेळी तिने ३० हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीत २० हजार देण्याचे ठरवले. प्रत्यक्ष मुलीला विकताना पोलिसांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले.
दत्तक मुलीस विकण्याचा डाव ठाणे पोलिसांनी उधळला
By admin | Published: July 01, 2017 7:34 AM