ठाण्याच्या महापौरांना तीन हजार रुपये दंड!
By admin | Published: January 5, 2016 03:04 AM2016-01-05T03:04:35+5:302016-01-05T03:04:35+5:30
शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात, आरोपी असलेले ठाण्याचे महापौर संजय मोरे हे या सुनावणीसाठी सोमवारी उशिरा
ठाणे : शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात, आरोपी असलेले ठाण्याचे महापौर संजय मोरे हे या सुनावणीसाठी सोमवारी उशिरा दाखल झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना चांगलेच फैलावर घेतले, शिवाय त्यांना न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी तीन हजारांचा दंडही ठोठावला आहे.
नारायण राणे यांच्यापाठोपाठ ठाण्यातील त्यांचे समर्थक रवींद्र फाटक काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी काही शिवसेना शाखांवर कब्जा मिळविला. किसननगर भागातील महाराष्ट्रनगर येथील शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या वादामध्ये २००५ मध्ये उद्भवलेल्या वादात काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला होता. त्यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील हल्लेखोरांविरुद्ध हाणामारी, शिवीगाळ, तसेच खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल झाले होते. ठाणे महापालिकेचे तत्कालीन शिक्षण मंडळ सदस्य संजय मोरे यांच्यासह ३० आरोपींचा यामध्ये समावेश होता. त्यातील ५ जणांचा मृत्यूही झाला आहे. सोमवारच्या सुनावणीच्या वेळी महापौर असलेल्या मोरे यांच्यासह आठ आरोपींना समन्स बजावण्यात आले होते. न्यायालयाने पुकारा केल्यानंतर मोरेवगळता उर्वरित सर्व हजर झाले होते. मात्र, त्यांचा पुकारा करूनही ते उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले. ही प्रक्रिया सुरू असतानाच, तिथे महापौर अत्यंत धावपळीत हजर झाले. न्यायालयाने त्यांना उशिरा आल्याबद्दल खडेबोलही सुनावून तीन हजारांचा दंडही भरण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या काही महत्त्वाच्या कामांमुळे आपल्याला हा उशीर झाल्याचे निवेदनही त्यांनी न्यायालयाला दिले. जिल्हा सरकारी वकील इब्राहिम कादरी यांनी या वेळी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.