नवी मुंबई : 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेतील २६ हजार घरांच्या सोडतीसाठी शनिवारचा मूहुर्त निश्चित केला होता. मात्र, काही तास अगोदर सिडकोने ही सोडत अचानक रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारवर नाराज असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावामुळेच पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे.
"ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर; आमदार-खासदारांना पैशाचं आमिष"
सिडकोच्या २६ हजार घरांसाठी २१ हजार ५०० अर्जदारांनीच अर्ज शुल्कासह अनामत रक्कम भरली आहे. त्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी तळोजा येथे संगणकीय सोडतीचे आयोजन केले होते. परंतु, शनिवारी अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती सिडकोने दिली. दरम्यान, रद्द केलेल्या सोडतीसाठी १९ फेब्रुवारीला दुपारी २ ते ४ च्या दरम्यान मुहूर्त निश्चित केला आहे.
ऐन वेळी लॉटरी रद्द झाल्याने अर्जदारांनी संताप व्यक्त केला आहे. पाच महिने झाले तरी लॉटरी निघत नसल्याने अर्जदार संतप्त झाले आहे. अर्जदारांचे पैसे अडकले आहेत. तसेच घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. शिवाय सिडकोकडून लॉटरी पुढे का ढकलली याचेही कोणते ठोस कारण देण्यात आले नाही. सिडकोने अनेकांना उशिरा मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे अशा अर्जदारांची दमछाकही झाली आहे. सिडकोने दोन ओळीची सुचना जाहीर दिली आहे. यात सिडकोच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी सुचना काढली आहे. शिवाय याबाबतचा मेसेजही पाठवण्यात आला आहे.