नवी मुंबई : नेरूळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर महानगरपालिकेने टाकाऊ वस्तूंपासून बनविलेली फ्लेमींगोची २८.५ फूट उंचीची शिल्पाकृत बसविली आहे. २६ यंत्रांमधील तब्बल १७९० टाकाऊ वस्तूंपासून हे शिल्प उभारले असून त्याची बेस्ट ऑफ इंडीया रेकॉर्ड संस्थेने दखल घेतली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत. स्वच्छतेची थ्री आर संकल्पना राबविली आहे. कचरा निर्मीतीमध्ये घट, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. टाकाऊ वस्तूंपासून विविध वस्तू व प्रतिकृती तयार केल्या जात आहेत. नवी मुंबईमध्ये फ्लेमींगो पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला फ्लेमींगो सिटीचा दर्जा मिळावा यासाठी मनपाने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात विविध ठिकाणी फ्लेमींगोच्या प्रतीकृती बसविल्या आहेत.
नेरूळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे २८.५ फूट उंचीची प्रतीकृती बसविण्यात आली आहे. प्रतीकृती बसविण्यासाठी जवळपास ४ फूट उंचीचा चौथरा तयार केला आहे. प्रतीकृती तयार करण्यासाठी यंत्रांमधील वापर बंद केलेल्या भागांचा उपयोग केला आहे. तब्बल १७९० पार्टचा उपयाेग करण्यात आला आहे. टाकाऊतून टिकाऊ स्वरूपाची ही देशातील सर्वात उंच प्रतीकृती ठरली आहे. या शिल्पाकृतीची बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड या संस्थेन दखल घेतली आहे. संस्थेचे परिक्षक बी. बी. नायक यांनी याविषयीचे प्रमाणपत्र मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे दिले आहे.