फावल्या वेळेत इंस्टाचे व्यसन नडले ....रिल्स बनविणारे पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन!
By वैभव गायकर | Published: January 27, 2024 01:57 PM2024-01-27T13:57:19+5:302024-01-27T13:57:46+5:30
पनवेल महामहापालिकेत गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपनीकडून मनुष्यबळ पुरविले जाते.
पनवेल: पनवेल महानगरपालिकेत कर्तव्यावर असताना फावल्या वेळेत इंस्टा व्हिडीओ बनविणे सहा कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. कार्यालयीन वेळेत इन्स्टाग्रामवर अभिनयाचे व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर प्रसिद्ध करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबन करून कार्यालयीन वेळेत गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी कारवाईच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
पनवेल महामहापालिकेत गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपनीकडून मनुष्यबळ पुरविले जाते. या कंत्राटदारामार्फत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे इन्स्टावर अनेक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाले. यामध्ये एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचे देखील समावेश आहे. व्हायरल होत असलेले व्हिडिओ पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना देखील प्राप्त झाले.
याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांना दिले. त्यानुसार रिल्समध्ये सहभाग असलेला महेंद्र ठाकूर, आश्विनी नानासो हजारे, सुनिता सुजित नाईक, सुलोचना गडहिरे, अमर नाईक हे पाच कंत्राटी कामगार डेटा इन्ट्री ऑपरेटर आहेत. तसेच महापालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून लिपिक पदावर काम करणारे आकाश केणी यांचा सहभाग होता. कंत्राटी कामगारांचे थेट निलंबन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून लिपिक आकाश केणी याला कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करीत कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
कर्मचाऱ्यांचे गैरवर्तणूक खपवून घेतला जाणार नाही.कर्मचाऱ्यांनी नियमात आणि शिस्तीत काम केलेच पाहिजे.अशाप्रकारे व्हिडीओ बनवून प्रसारित करणे म्हणजे पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे.यामुळे तत्काळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
- गणेश देशमुख (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)