घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांसाठी प्रशासन सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:42 PM2023-02-17T15:42:48+5:302023-02-17T15:43:16+5:30

बेटावर घुमणार  बम. . . बम. . . भोलेचा सूर 

The administration is ready for thousands of local and foreign Shiv devotees coming for Maha Shivratri on Gharapuri Island | घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांसाठी प्रशासन सज्ज 

घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांसाठी प्रशासन सज्ज 

googlenewsNext

मधुकर ठाकूर -

उरण : जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्तांचे बम. . . बम. . . भोलेचे सूर घुमणार आहेत. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांची सुरक्षितता, स्वागत आणि जाण्या-येण्याच्या व्यवस्था करण्यासाठी पोलिस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. मात्र या वर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात ६५ रुपये दर आकारणी करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा तिकीट दरात पाच रुपये वाढ झाली असली, तरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांमध्ये थोडाही उत्साह कमी होणार नसल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. 

मुंबईपासुन अवघ्या ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिध्दीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रुपे असलेली अनेक प्रचंड शिल्प आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्‍वर शिव, कल्याणमुर्ती, अंधकासुरवध, गंगावतारण शिव, योगीश्‍वर उमा महेश्‍वरमुर्ती आणि २० फुट उंच आणि रुंदीची महेशमुर्ती आदि शिल्पांचा समावेश आहे. 

महाशिवरात्री निमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते. 

घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, जेएनपीए, उरण-मोरा,न्हावा, वाशी, बेलापूर,उलवा,माहूर आदी बंदरातून होड्या,लॉचेस,मचव्यांची सोय आहे. घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ठिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच धोकादायक ठरणाऱ्या नादुरुस्त रस्त्यावर रेलिंग लावण्यात आले आहे. तसेच भाविकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी नागरी सुरक्षा दलाचे ४० रक्षक तैनात करण्यात आले असल्याची माहिती घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकुर यांनी दिली. 

 त्याचबरोबर बेटावर महाशिवरात्री निमित्ताने मोरा-उरण बंदरातुनच दरवर्षी ५० ते ६० हजार भाविक हजेरी लावतात.  मोरा बंदरातुन बेटावर येणाऱ्या शिवभक्त भाविकांसाठी पोलिस, बंदर विभागाच्या माध्यमातून १२ खासगी ट्रॉलर्स तैनात करण्यात आले आहेत.  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात ६५ रुपये तर परतीच्या दुहेरी प्रवासासाठी १३० रुपये दर आकारणी करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा तिकीट दरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली. तर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  त्यामध्ये स्थानिक ११ कर्मचाऱ्यांसह अधिकारी-६, पोलिस कॉन्स्टेबल-४८ व महिला कर्मचारी - ३५ असे ९० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या शिवभक्तांनी नियम पाळून शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी केले आहे.  यासाठी गुरुवारी बेटावर पाहणी दौराही करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.  
 जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांमुळे बम. . . बम. . .  भोलेचे सूर घुमणार आहेत. 

उरण तालुक्यातील माणकेश्वर,देऊळवाडी, रेल्वे स्टेशन जवळील निळकंठ शिवमंदिर,होणेश्वर-बोरी, जासई, चिरनेर,आवरे येथील शिवमंदिरातही महाशिवरात्री साजरी केली जाते. 
 

Web Title: The administration is ready for thousands of local and foreign Shiv devotees coming for Maha Shivratri on Gharapuri Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.