वैभव गायकर,पनवेल : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कारभार सुरू असलेल्या पनवेल महापालिकेतील आयुक्त ,दोन उपायुक्तांच्या तडकाफडकी बदली नंतर पालिकेतील रिक्त पदांचा विषय पुन्हा एकदा पुढे आला आहे.बदली झाल्यानंतर रिक्त जागांवर त्वरित अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे असताना महत्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर पालिकेचे कामकाज उघड्यावर आले आहे.निवडणुक आयोगाच्या निर्देशानंतर शासनाने राज्यभर बदल्यांचे सत्र चालवले मात्र याबाबत पर्यायी व्यवस्था शासनाला करता आलेली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यापुर्वीच पनवेल महानगरपालिकेतील मंजूर 12 सहाय्यक आयुक्त पदांच्या जागी केवळ 11 पदे भरली गेली नसल्याने महापालिकेच्या चार प्रभागांसह अनेक विभागातील महत्वाच्या पदांची जबाबदारी लिपिक दर्जांचे अधिकारी सांभाळत आहेत.अशातच पावसाळ्याच्या तोंडावर उपायुक्त दर्जाचे अधिकारी बदलले गेले असल्याने मान्सूनपूर्व कामे,31 मार्च पूर्वी मालमत्ता कर वसुलीवर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.
आकृतीबंधाला मंजूरी मिळविण्यास पनवेल महापालिकेचे माजी आयुक्त गणेश देशमुख यांना यश आले.1042 पदांना मंजुरी मिळाली आहे, परंतू सद्यस्थितीत नगरपालिका आणि महापालिकेत समाविष्ट झालेले कर्मचारी मिळून महापालिकेत 393 पदांवर कायमस्वरूपी कामगार काम करतात. याशिवाय मनुष्यबळ पुरविणाऱ्या ठेकेदाराच्या माध्यमातून शेकडो कर्मचारी काम करतात. सध्यस्थितीत महापालिकेत मागील सहाय्यक आयुक्त पदे रिक्त असतान अचानक पालिका आयुक्त गणेश देशमुख आणि दोन उपायुक्त सचिन पवार आणि गणेश शेटे यांच्या बदलीनंतर महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
सचिन पवार सांभाळत असलेले आरोग्य विभागाचे उपायुक्त पद डॉ वैभव विधाते यांच्याकडे सोपविण्यात आले आहे तर महत्वाचे असे मालमत्ता कर विभागाचे पदभार कैलास गावडे यांच्याकडे देण्यात आले आहे.सद्यस्थिती 11 सहाय्यक आयुक्त आणि 3 उपायुक्त आणि आयुक्त पद रिक्त असल्याने पालिका प्रशासनाचा कामकाज उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे.लवकरात लवकर हि पदे भरण्याची गरज आहे.अन्यथा मालमत्ता कर वसुली,आरोग्य विभाग तसेच मान्सूनपूर्व कामांचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेकडो कोटींची विकासकामे सुरु -
पालिका मुख्यालय,माताबाल रुग्णालय,प्रभाग कार्यालये,शाळांची उभारणी,रस्त्यांची कामे,नव्याने केलेली नोकरभरती,अमृत योजनेची कामे,हजार कोटींचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट आदींसह महत्वाची कामे सध्या पालिकेसमोर आहेत.जवळपास 800 कोटींपेक्षा जास्त विकासकामे सुरु आहेत.हि कामे मार्गी लावण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची पालिकेला गरज आहे.अचानक झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे विकासकामे तसेच मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.