कमलाकर कांबळे
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागल्याच्या पार्श्वभूमीवर सिडकोने आता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईतही एरोसिटी अर्थात हवाई शहर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली असून लवकरच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. देशातील हे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे. येथे पहिल्या टेकऑफसाठी डिसेंबर २०२४ चा मुहूर्त निश्चित केला आहे. येत्या अडीच वर्षात विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे विमानतळाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सिडकोचा भर आहे. दळणवळणाच्या प्रभावी साधनांबरोबरच विमानतळ क्षेत्रात दिल्लीच्या धर्तीवर १८० हेक्टर जागेवर भव्य एरोसिटी अर्थात हवाई शहर उभारण्यात येणार असून त्यानुसार आराखडाही तयार केला आहे. नियोजित एरोसिटीमधील भूखंड विक्रीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
नवी मुंबईला मेट्रोला जोडणारदिल्ली एरोसिटीतून अवघ्या काही मिनिटांत विमानतळ गाठता येते. दिल्ली मेट्रो या एरोसिटीला जोडले आहे. त्याच धरतीवर नवी मुंबई मेट्रो नियोजित एरोसिटीला जोडण्याची योजना आहे. मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीला सज्ज झाला आहे. खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ हा मेट्रोचा तिसरा टप्पा असेल.
दळणवळणाच्या साधनांवर भरसुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूचा शास्त्रोक्त व नियोजनबद्ध विकास व्हावा, या दृष्टीने सिडकोने मास्टर प्लान तयार केला आहे. यात सार्वजनिक वाहतुकीवर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबई विमानतळाशी संलग्नता वाढावी, यादृष्टीने न्हावा शेवा-शिवडी सागरी मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
१७ पंचतारांकित हॉटेलचे नियोजन विमान प्रवाशांचा प्रवास, खरेदी आणि निवास एकाच ठिकाणी असावा, या दृष्टीने या हवाई नगरीचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, या नियोजित हवाई शहरात सिडको कोणतेही बांधकाम करणार नाही. पंचतारांकित हॉटेलसाठी येथील भूखंडांची लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. १७ पंचतारांकित हॉटेल व आलिशान मॉल असणार आहेत.