पनवेलकरांचा श्वास कोंडला; एअर क्वालिटी इंडेक्समध्ये प्रदूषण ३०० पार?
By वैभव गायकर | Published: November 8, 2023 08:08 PM2023-11-08T20:08:11+5:302023-11-08T20:08:19+5:30
कळंबोली मधील चाचणी केंद्रात दि.8 रोजी हवेचा दर्जा अत्यंत नीचांकी दाखवण्यात आला.
पनवेल: महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने कळंबोली येथे बसविलेल्या हवेचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणेत प्रदूषणाचे मोजमाप करणारे इंडेक्स 300 पार असल्याचे दाखविण्यात आल्याने पनवेल मधील प्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने बेलापूर मधील स्टेट महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे चाचणी केंद्र, दुसऱ्या बाजूला कळंबोली मध्ये स्थित चाचणी केंद्र, आणि त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला तोंडरे येथे म्हणजे एमआयडीसी तळोजा येथे स्थित याठिकाणी हवेचे मोजमाप करणारे यंत्रणा बसविल्या आहेत.
कळंबोली मधील चाचणी केंद्रात दि.8 रोजी हवेचा दर्जा अत्यंत नीचांकी दाखवण्यात आला. याठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स इथे 300 च्या वर प्रदूषण दाखविण्यात आले. नायट्रोजन डायॉक्साईड, या घटकाचा प्रमाण धोकादायक पातळी ओलांडून, श्वसन प्रक्रियेला विघातक परिणामकारक ठरू शकतो अशी शक्यता हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई सह संपूर्ण एमएमआर झोन मध्ये प्रदूषणाची पातळी धोकादायक पोहचल्याने शासनाने विविध सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बसविलेल्या यंत्रणेत दाखविलेल्या मशीनमध्येच हवेची गुणवत्ता खराब असल्याने एमपीसीबीने तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे खारघर मधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी सांगितले.तळोजा एमआयडीसी मधील उग्र वासाने पनवेलकर त्रस्त आहेत.प्रदूषणकारी कारखाने प्रदूषणास सर्वात जास्त जबाबदार असल्याचे मत तळोजा मधील रहिवासी राजीव सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.
कळंबोली पनवेल परिसरात एअर क्वालिटी इंडेक्स 300 पर्यंत नाही.हवेची मोजमाप करणारी यंत्रणेला पुन्हा नव्याने सुरु करून हवेची गुणवत्ता तपासावी लागेल. -प्रशांत भोसले (उपप्रादेशिक अधिकारी,एमपीसीबी )
पनवेल महानगरपालिकेच्या उपाययोजना -
प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचा सूचना शासनाकडून प्राप्त होताच पनवेल महानगरपालिकेने उपायोजना राबविण्यास सूचना केल्या आहेत.आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने उपायुक्त डॉ वैभव विधाते यांनी पथक स्थापन करून पालिका हद्दीत प्रदूषणाच्या ठिकाणी उपाययोजना व जनजागृतीसह सूचना केल्या आहेत.