विमानतळामुळे नवी मुंबई देशात नंबर १ होईल, १ लाख रोजगारही मिळतील; मंगलप्रभात लोढा यांचा विश्वास
By नामदेव मोरे | Published: January 16, 2024 04:23 PM2024-01-16T16:23:47+5:302024-01-16T16:23:56+5:30
४ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देशात सर्वाधीक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे या परिसरात थेट १ लाख नागरिकांना व ४ जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. स्टार्टअपमध्येही नवी मुंबईला देशात नंबर १ होण्याची संधी असल्याचा विश्वास कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी या विषयावर वाशी मधील सिडको सभागृहात आकांक्षा की उडान परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी तरूणांनी स्वत:चा व्यवसाय उभारण्यास प्राधान्य द्यावे. नोकरी देणारे तरूण तयार झाले पाहिजेत असे मत केले. देशात स्टार्टअप इंडियाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक आहे. नवी मुंबई विमानतळामुळे या परिसरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या संधीचा तरूणांनी लाभ घ्यावा व स्वत:चा स्टार्टअप सुरू करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अदाणी एनएमआयएएल चे सीईओ बीव्हीजेके शर्मा यांनी विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराचा विकास झपाट्याने होणार असल्याचे मत व्यक्त केले.
एनएमआयएएल चे चारूदत्त देशमुख यांनी यांनी विमानतळामुळे हाॅटेल, लॉजीस्टीक, कार्गोपार्क, बांधकाम व्यवसायाला गती मिळणार आहे. डिसेंबर अखेर पहिल्या टप्याचे बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी यांनी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांनीही त्यांची भुमीका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये माजी आमदार संदीप नाईक, निलेश म्हात्रे, सतीश निकम यांनी महत्वाची भुमीका बजावली. केंद्रीय राज्य मंत्री जनरल व्ही के सींग यांनी ऑनलाईन भाषणाद्वारे या उपक्रमाचे स्वागत केले.
विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव
परिषदेमध्ये व्यासपिठावर प्रकल्पग्रस्तांचे नेते दि बा पाटील यांची प्रतीमा ठेवण्यात आली होती. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा सर्व प्रकल्पग्रस्तांचा आग्रह असून तो लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. आमदार गणेश नाईक यांनीही दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असा विश्वास व्यक्त केला. पहिल्या विमानउड्डाणामध्ये लोकनेते दि बा पाटील विमानतळावर आपले स्वागत हे शब्द ऐकण्यास मिळतील असा विश्वास व्यक्त केला.