पनवेल : खारघर सेक्टर 16 वास्तुविहार सोसायटीत दि.14 रोजी तरस हा हिंस्त्र प्राणी शिरल्याचा दावा सोसायटीतील काही रहिवाशांनी केला होता.या प्राण्याचा व्हिडीओ देखील काही रहिवाशांनी काढला होता.लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केला होता.त्यांनतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली.त्यांनतर हा प्राणी तरस नसुन लांडगा असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी डी एस सोनावणे यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार दि.15 रोजी वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अशोक घुगे,वनरक्षक महेश चन्नागिरे, वनरक्षक जगदीश राक्षे यांनी सेलिब्रेशन सोसायटीत अनेक ठिकाणची पाहणी केली.यावेळी हा प्राणी तरस नसून लांडगा सदृश्य प्राणी असल्याची वनरक्षक महेश चन्नागिरे यांनी सांगितले.यापूर्वी देखील या परिसरात लांडगा पाहिल्याचा दावा प्राणीनित्रांनी केला असल्याचे चन्नागिरे यांनी सांगितले.या सोसायटीच्या मागील बाजुस असलेल्या खाडीतील खारफुटीच्या जंगलात लांडग्यांचा अधिवास असल्याचे चन्नागिरे यांनी सांगितले.पहिला गेलेला लांडगा हिंस्त्र नसुन या प्राण्यांपासून येथील रहिवाशांना धोका नसल्याचेही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सेलिब्रेशन सोसायटीच्या मागील बाजूस खाडीत मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वन्यजीव पाहिले जातात.त्यामुळे या परिसराला संरक्षण देण्याची मागणी भाजपचे पदाधिकारी समीर कदम यांनी केली आहे.