क्रिकेट, फुटबॉलसाठी खेळाडूंना पालिकेच्या टर्फचे आकर्षण
By योगेश पिंगळे | Published: April 21, 2024 07:56 PM2024-04-21T19:56:13+5:302024-04-21T19:57:08+5:30
इतर क्रीडा सुविधांनादेखील प्राधान्य देण्याची खेळाडूंची मागणी
नवी मुंबई : शहरात विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू घडावेत तसेच सराव करता यावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून घणसोली आणि सीबीडी बेलापूर येथे टर्फ विकसित करण्यात आले आहेत. या टर्फला खेळाडूंनी पसंती दिली असून शहरातील खासगी संस्थांच्या टर्फच्या तुलनेत महापालिकेच्या टर्फचे भाडे कमी असल्याने या टर्फला क्रिकेट आणि फुटबॉल खेळाडूंकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शहरात इतर क्रीडा सुविधादेखील उपलब्ध करून देण्याची मागणी खेळाडू करत आहेत.
शहरातील खेळाडूंना खेळण्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारातील खेळाडू शहरात घडावेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महापालिकेने सीबीडी येते राजीव गांधी स्टेडियम, नेरुळ येथे कै. यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण, सीबीडी व घणसोली येथे मल्टिपर्पज टर्फ, घणसोली व नेरुळ येथील स्केटिंग पार्क, फिटनेस सेंटर आदीं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांना खेळाडूंचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या घणसोली आणि सीबीडी येथील मल्टिपर्पज टर्फचे भाडे शहरातील इतर खासगी टर्फच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने महापालिकेच्या या दोन्ही मल्टिपर्पज टर्फला फुटबॉल आणि बॉक्स क्रिकेटसाठी खेळाडूंची मोठी मागणी आहे. या टर्फचे भाडे शहरातील खेळाडूंसाठी ४०० रुपये प्रतितास, सुटीच्या दिवशी ५०० रुपये प्रतितास आणि सुटीच्या दिवशी संध्याकाळी ६०० रुपये प्रतितास याप्रमाणे आकारले जाते. शहरातील विविध कंपन्यांच्या माध्यमातूनदेखील टर्फचे बुकिंग केले जाते कंपन्यांसाठी ७०० रुपये प्रतितास याप्रमाणे भाडे आकारले जाते.
महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टर्फ मोफत उपलब्ध करून दिले जाते. सीबीडी येथील मल्टिपर्पज टर्फच्या माध्यमातून गतवर्षी ६ लाख ७५ हजार ५२१ रुपये तर घणसोली येथील मल्टिपर्पज टर्फच्या माध्यमातून १३ लाख ९२ हजार ६७८ रुपयांचा महसूल महापालिकेकडे जमा झाला आहे. सीबीडी आणि घणसोली प्रमाणे शहरातील प्रत्येक विभागात मल्टिपर्पज टर्फ उपलब्ध करून देण्याची मागणी खेळाडूंच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच आर्चरी, व्हॉलीबॉल, कब्बडी, हॉकीची लहान मैदाने, बास्केटबॉल यासारख्या विविध क्रीडा सुविधादेखील उपलब्ध करून देण्याची मागणी शहरातील खेळाडू करत आहेत.