मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:05 PM2024-03-09T14:05:27+5:302024-03-09T14:06:26+5:30
महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.
उरण : महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवून दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकिटाऐवजी बोट चालकांकडून ७०-८० रुपये वसूल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती. राजबंदर जेट्टीवर दुपारी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण-मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
मनमानीपणे तिकिटाची आकारणी
- ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून या वर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.
- यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट दर ठरवून दिला होता. मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालकांकडून एकेरीसाठी ७०-८० रुपये तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते, याचाही भाविकांना भुर्दंड पडला.
- बोटीत अडकून पडलेल्या महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले. हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहोटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या.
- मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यंत पोहोचल्या.
- प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.