नगररचना अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन रायगडचे निर्माते हिरोजी इंदुलकरांचा राखणार सन्मान
By नारायण जाधव | Published: February 23, 2023 05:47 PM2023-02-23T17:47:50+5:302023-02-23T17:48:05+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड किल्ल्याचे निर्माते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकरांचा आता राज्य सरकार अनोख्या पद्धतीने सन्मान करणार आहे.
नवी मुंबई - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड किल्ल्याचे निर्माते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकरांचा आता राज्य सरकार अनोख्या पद्धतीने सन्मान करणार आहे. राज्यातील विविध शहरांच्या नगररचनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता हिरोजी इंदुलकरांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दरवर्षी ३१ जानेवारी या नगररचना दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
मंत्रालयस्तरावर ५, विभाग स्तरावर तांत्रिक संवर्गाचे १७ आणि अतांत्रिक संवर्गाचे ८ असे एकूण ३० पुरस्कारांनी दरवर्षी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश येथील कोकण भवनात प्राप्त झाले आहेत.
हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यासह महाराजांच्या अनेक गडकोट किल्ल्यांच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्याचे सांगितले जाते; पण रायगडसारखा अभ्यद्य आणि वास्तुरचनेचा अत्युच्च नमुना असलेला किल्ला हिराेजींच्या स्थापत्य ज्ञानाची साक्ष देतो. किल्ल्यावरील बाजारपेठ, राणीवसा, सदर, महाल, रायरेश्वर मंदिर, विविध बुरूज पाहून याची कल्पना येते.
अधिकाऱ्यांचे हे गुण लक्षात घेणार
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षांतील गोपनीय अहवाल, त्यांची कामातील सचोटी, वक्तशीरपपणा, कामाची क्षमता, केलेल्या कामांचा निपटारा, कामाविषयीचे ज्ञान, सामान्य ज्ञान, संवादकौशल्य, नावीन्यपणा, निपक्षपणा, निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा आदी गुण लक्षात घेऊन हे पुरस्कार देऊन गुणवंत अधिकाऱ्यांना हिरोजी इंदुलकरांच्या नावाने गौरविण्यात येणार आहे.
रायगड किल्ला बांधत असताना महाराजांनी दिलेला पैसा, धन संपल्याने इंदुलकरांनी आपली शेतजमीन आणि राहता वाडा विकून उर्वरित किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केल्याचे सांगतात. हे महाराजांना समजताच त्यांनी हिरोजींचे तोंडभरून कौतुक करून त्यांना काय हवे ते मागा हिरोजी, असे सांगितले.
तेव्हा हिरोजींच्याच विनंतीवरून रायगड किल्ल्यावरील रायरेश्वर मंदिराच्या एका पायरीवर त्यांचे नाव कोरले आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, स्वराज्याविषयीचा त्यांना असलेला अभिमान याची प्रेरणा आताच्या पिढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांत रुजावी, या हेतूने राज्याच्या नगरविकास विभागाने आपल्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्या स्मृतीस अनाेख्या पद्धतीने सन्मानित करण्याच्या निर्णय घेतल्याने स्वराज्यप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.