चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 09:30 IST2025-04-18T09:28:39+5:302025-04-18T09:30:23+5:30

Ganesh Naik Eknath Shinde: कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

The burden of fourteen villages will never be tolerated, Ganesh Naik continues to oppose Shinde's decision | चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम

चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम

नवी मुंबई : शहरवासीयांना विश्वासात न घेता १४ गावे नवी मुंबईवर लादली आहेत. हा भुर्दंड कदापि सहन करणार नाही. करदात्यांच्या पैशांचा दुरूपयोग होऊ देणार नसून नवी मुंबईच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला जाईल, अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. 

कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षे मालमत्ता कर वाढविलेला नाही. २०४५ पर्यंत अजून २० वर्षे करवाढ केली जाणार नाही. शहराचा विकास करताना नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकला जाणार नाही. 

नवी मुंबईकरांच्या हितापुढे मंत्रिपद महत्त्वाचे नाही

नवी मुंबईकरांना विश्वासात न घेता १४ गावे लादली आहेत. या गावांच्या सोयी-सुविधांसाठी ६८०० कोटी  रुपयांची गरज असून ती द्यावी, असा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी दिला होता. 

अतिक्रमणे काढून देण्याची मागणीही केली होती. परंतु, या अटींचा विचार न करता या गावांचा समावेश केला आहे. आता शहरवासीयांनी कररूपाने दिलेल्या पैशांतून तेथील गावांचा विकास करायचा का?, नागरिकांना हा भुर्दंड सहन करू दिला जाणार नाही. शहराच्या हितासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल. नवी मुंबईच्या हितापुढे आमदार, मंत्रिपद महत्त्वाचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक सूरज पाटील, गणेश भगत आदी उपस्थित होते. 

हा नाईक-शिंदे वाद नाही

१४ गावांच्या विकासासाठी लागणारा ६८०० कोटींचा भुर्दंड  नवी मुंबईकरांनी का सहन करायचा. आमची भूमिका नवी मुंबईच्या हिताची आहे. काहीजण याला शिंदे-नाईक विरोधाचा रंग देत आहेत; पण हा राजकीय  विरोधाचा विषय  नसून नवी मुंबईचे नुकसान टाळण्यासाठीची भूमिका असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.

Web Title: The burden of fourteen villages will never be tolerated, Ganesh Naik continues to oppose Shinde's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.