शेतीवरील भार कमी केला पाहिजे, शरद पवार यांचं महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले नागरीकरणासह कारखानदारीमुळे शेतीक्षेत्रात घट
By नामदेव मोरे | Published: February 11, 2023 02:00 PM2023-02-11T14:00:02+5:302023-02-11T14:00:48+5:30
Sharad Pawar: शेतीला अधुनीकतेची जोड देण्याची गरज असून इतर व्यवसायांकडेही वळले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई : नागरीकरण व कारखानदारीमुळे शेतीच्या क्षेत्रात घट होत आहे. शेतीवरील भार कमी केला पाहिजे. शेतीला अधुनीकतेची जोड देण्याची गरज असून इतर व्यवसायांकडेही वळले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या माध्यमातून सानपाडा मध्ये उभारण्यात आलेल्या देशस्थ मराठा भवनच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार बोलत होते. त्यांनी यावेळी मुंबईतील गिरणीकामगार ते कृषी व्यापारातील बदलाचा आढावा घेतला. कृषी व्यापर नवी मुंबईमध्ये स्थलांतर केल्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात व देशात फळ उत्पादन वाढविण्यासाठी सत्तेत असताना प्रयत्न केले. आता फळ उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात विकास कामे करण्यासाठी जमीनी संपादन कराव्या लागत आहेत. शहरीकरण वाढत आहे.कारखानदारी वाढत आहे. यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत आहे. देशात ५६ टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. भविष्यात सर्वांनी शेतीत न राहता पर्यायी व्यवसाय उभारावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतीला अधुनीकतेची जोड दिली पाहिजे. शेती व शेती व्यवसायात आहेत, त्यांनी तेथे रहावे पण पुढील पिढीमधील काहींना नवीन क्षेत्रातही पाठविले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मराठा ज्ञाती संस्था हे एक समाजासाठीचे व्यासपीठ आहे. जुन्नर, आंबेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्राधान्य दिले असून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन कामे करणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी बाजारपेठेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार अतूल बेनके यांनीही जुन्नर तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले. संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र नलावडे यांनी संस्थेच्या १८३० पासूनच्या वाटचालीचा व वर्तमान स्थितीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजन थोरवे, बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, अशोक हांडे, शंकर पिंगळे, चंद्रकांत ढोले, भगवान थोरात, महेश मुंढे, नामदेव भगत, बाळासाहेब सोळसकर, संदीप सुतार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेने दिली होती महात्मा ही पदवी
मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेची स्थापना १८३० मध्ये झाली आहे. या संस्थेने जुन्नर, आंबेगाव परिसरातून मुंबईल आलेल्या नागरिकांना आधार दिला. याच संस्थेने महात्मा ज्योतीबा फुले यांना महात्मा ही पदवी दिल्याची आठवणही शरद पवार यांनी सांगितली. गावाकडे व शहरात होणाऱ्या बदलांचाही आढावा घेतला.