फोन आला अन् अपघात झाला; बस थांब्यावर उभ्या असलेल्या तरुणाला ट्रकची धडक, मृत्यू
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 14, 2023 07:45 PM2023-04-14T19:45:11+5:302023-04-14T19:45:17+5:30
सायन पनवेल मार्गावर सानपाडा जंक्शनवर हा अपघात घडला आहे.
नवी मुंबई : टॅक्सीत बसून जात असतानाच फोन आल्याने बस थांब्यावर उभे राहून फोनवर बोलणाऱ्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. मामाच्या मुलाची हळद उरकून घरी जाणाऱ्या तरुणासोबत हा अपघात झाला. यामध्ये दोन वाहनांचे देखील नुकसान झाले असून पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सायन पनवेल मार्गावर सानपाडा जंक्शनवर हा अपघात घडला आहे.
सायन येथे राहणारा प्रशांत पाटील त्याच्या मामाच्या मुलाच्या हळदीसाठी मित्र आकाश महाडिक याच्यासोबत पनवेलच्या नावडे येथे आला होता. बुधवारी रात्री हळदीचा कार्यक्रम उरकल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही परत सायनला चालले होते. रात्री दिडच्या सुमारास गाड्या बदलत ते सानपाडा जंक्शन याठिकाणी पोचले असता, तिथून सायनला जाणाऱ्या गाडीच्या शोधात होते. त्याचवेळी एका टॅक्सी चालकाने त्यांना वाशीपर्यंत सोडतो असे सांगितले. त्यानुसार दोघेही टॅक्सीत बसत असतानाच प्रशांतला कोणाचातरी फोन आला. यामुळे तो पुन्हा टॅक्सीबाहेर येऊन बाजूच्याच बस थांब्याजवळ उभा राहून फोनवर बोलत होता.
त्याचवेळी मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने प्रशांतला जोराची धडक देऊन त्याठिकाणी उभ्या असलेल्या दोन रिक्षांनाही ठोकर मारली. यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाला असता रिक्षातून त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक फजल मुल्ला याच्या विरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.