उद्धवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची जामिनावर न्यायालयातून सुटका; महामुंबई सेझ विरोधातील आंदोलनाचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:17 AM2024-10-18T10:17:02+5:302024-10-18T10:17:45+5:30
गुरुवारी सर्वांची ३० हजारांच्या जामिनावर सुटका झाल्याची माहिती बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली. यामध्ये माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाध्यक्ष संतोष ठाकूर यांचा समावेश आहे.
उरण : महामुंबई सेझ विरोधातील आंदोलनप्रकरणी सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने उद्धवसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांना बेलापूर न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, गुरुवारी सर्वांची ३० हजारांच्या जामिनावर सुटका झाल्याची माहिती बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली. यामध्ये माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाध्यक्ष संतोष ठाकूर यांचा समावेश आहे.
रिलायन्सच्या महामुंबई सेझविरोधात २००७ साली येथील शेतकऱ्यांनी संघर्षाची भूमिका घेतली होती. या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोकण भवनवर केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्याची नियमित सुनावणी न्यायालयात सुरू होती. मात्र, आरोपी सुनावणीवेळी सातत्याने गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. अखेर बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर सातही जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर सातही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार त्यांची ३० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.