वाशी (जि. धाराशिव) : साराेळा ते वाशी लिंक लाइनच्या कामाचे काय झाले, अशा शब्दांत जाब विचारीत, तिघांनी विद्युत अभियंत्याच्या डाेक्यात खुर्ची घालून रक्तबंभाळ केले. ही घटना ८ सप्टेंबर राेजी दुपारी वीज कार्यालयात घडली. या प्रकरणी रात्री उशिरा तिघांविरुद्ध वाशी ठाण्यात गुन्हा नाेंद झाला.
वाशी वीज कार्यालयात शुक्रवारी दुपारी अदालत सुरू हाेती. याच वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजितदादा गट) तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे तिथे आले. तहसीलसमाेर लाेक उपाेषणाला बसले आहेत. साराेळा ते वाशी या लिंक लाइनचे काय झाले, अशा शब्दांत प्रभारी सहायक अभियंता ज्याेतिर्लिंग शिवाजी हिंगमिरे यांना जाब विचारला असता, दाेघांमध्ये ‘तूतू-मैंमैं’ झाली. याचे पर्यावसन शिवीगाळीत झाले. ताेवर नगरसेवक भागवत कवडे व विनोद माने दाेघे तिथे आले.
यानंतर, तिघांनी मिळून ‘तू लई माजला आहे,’ असे धमकावत बाजूचीच खुर्ची हिंगमिरे यांच्या डाेक्यात घालून रक्तबंभाळ केले. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर रात्री वाशी ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून उपराेक्त तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका फंड करीत आहेत.