लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गेल्या २५ वर्षांत आपली राजकीय कारकीर्द संपविण्याचे उद्दिष्ट विरोधकांना साध्य झालेले नाही. आता जे आरोप करण्यात आलेले आहेत, ते एका कारस्थानाचा भाग आहेत, असा दावा करून तपासयंत्रणा आणि न्यायपालिकेच्या प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर मी पत्रकारांशी संवाद साधेन, असे स्पष्टीकरण माजी मंत्री आणि भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी दिले आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना एका महिलेने केलेल्या बलात्कार आणि जिवे ठार मारण्याच्या धमकीसंदर्भात छेडले असता वरील शब्दांत त्यांनी पहिल्यांदाच आपले म्हणणे मांडले.
आयुक्तांच्या भेटीप्रसंगी गणेश नाईक यांच्यासमवेत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, नगरसेवक अनंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, सूरज पाटील, अशोक पाटील, अमित मेढकर, नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणात जे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यातून माननीय न्यायालयाने मोकळीक देताना काही बंधने घातली आहेत. ती पूर्णत: मी पाळणार आहे. संपूर्ण तपासयंत्रणा आणि न्यायपालिकेच्या प्रक्रियेतून निर्दोष बाहेर पडल्यानंतर या विषयावर ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’ झाल्यावर मी पत्रकारांजवळ सविस्तर माझे म्हणणे मांडेन, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.