शहरातील बेघर, निराश्रितांचा मुक्काम उघड्यावर; रात्र निवारा केंद्र धूळ खात
By योगेश पिंगळे | Published: November 2, 2023 06:06 PM2023-11-02T18:06:15+5:302023-11-02T18:06:44+5:30
पावणे, तुर्भेत स्थानिकांचा विरोध : तर घणसोलीचे रात्र निवारा केंद्र धूळ खात
नवी मुंबई : शहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना निवारा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने बेलापूर आणि घणसोली विभागात रात्र निवारा केंद्र सुरू केले आहे. बेलापूरचे केंद्र शहरच्या एका बाजूला असल्याने त्याचा वापरच होत नसून घणसोली येथील निवारा केंद्र बेघर नागरिकांसाठी अद्याप सुरू न केल्याने शहरातील बेघर, निराश्रितांना पदपथ आणि रस्त्याच्या कडेला मुक्काम करावा लागत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी विविध राज्यातून शहरांमध्ये आलेल्या बेघर निराश्रित व्यक्तींना रस्ते, पदपथ किंवा उघड्यावर राहावे लागू नये यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात रात्र निवारा केंद्राची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार त्या शहरामधील संबंधित प्राधिकरणांनी जागा उपलब्ध करून दिल्यावर त्या जागांवर रात्र निवारा निवारा केंद्र बांधण्यासाठो राज्य शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. नवी मुंबई महापालिकेने २०१४ साली पावणे एमआयडीसीतील श्रमिकनगर येथे शहरातील बेघर निराश्रित नागरिकांसाठी समाज मंदिराच्या इमारतीमाध्ये रात्र निवारा केंद्र सुरू केले होते. परंतु, तेथे ये-जा सोयीचे नसल्याने केंद्राला प्रतिसाद न मिळाल्याने ते बंद पडले. त्यानंतर तुर्भे सेक्टर २१ येथील समाज मंदिराच्या इमारतीमध्ये रात्र निवारा केंद्र सुरू केले होते. या केंद्रात येणारे नागरिक कोणत्या वृत्तीचे असतील या कारणाने या इमारती शेजारील स्थानिक नागरिकांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी त्याला विरोध केल्याने तेदेखील बंद केले. सध्या स्थितीमध्ये आग्रोळी उड्डाणपुलाखाली पालिकेच्या वास्तूमध्ये रात्र निवारा केंद्र सुरू आहे. परंतु हे तेदेखील शहराच्या एका बाजूला असल्याने शहराच्या इतर भागातील बेघर निराश्रित व्यक्ती या केंद्राचा लाभ घेऊ शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून पदपथ आणि रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये शहरात १२७ बेघर आणि निराश्रित व्यक्ती असल्याची नोंद झाली होती. शहरातील विविध नोडमध्ये आता ती संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये लहान मुले, स्त्रिया, वयोवृद्ध नागरिक पदपथ आणि रस्त्याच्या कडेला वास्तव्य करीत आहेत. महामार्गाच्या शेजारील पदपथावर मुक्काम करणाऱ्या बेघर निराश्रितांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
घणसोलीतील निवारा केंद्र सुरू करा
महापालिकेने घणसोली सेक्टर ४ मध्ये रात्र निवारा केंद्र उभारले आहे. या वास्तूमध्ये काही वर्षे तात्पुरत्या स्वरूपात नागरी आरोग्य केंद्र सुरू होते. काही महिन्यांपूर्वी नागरी आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु, रात्र निवारा केंद्राची इमारत मात्र धूळखात पडली आहे. शहरातील बेघर निराश्रित व्यक्तींसाठी या केंद्राचा वापर तत्काळ सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
घणसोली येथील रात्र निवारा केंद्र या महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. शहरातील बेघर, निराश्रित व्यक्तींचा मागील काही वर्षांपासून सर्व्हे झालेला नाही. एका खासगी संस्थेच्या माध्यमातून तो करण्याचे विचाराधीन आहे.
डॉ. श्रीराम पवार, उपआयुक्त समाजविकास विभाग, न.मुं.म.पा.