नवी मुंबईत बंद पडलेले 'आपले सरकार सेवा केंद्र' लवकरच होणार सुरू
By कमलाकर कांबळे | Published: August 18, 2023 06:20 PM2023-08-18T18:20:03+5:302023-08-18T18:20:13+5:30
कोकण विभागीय आयुक्तांच्या संबंधित विभागाला सूचना
नवी मुंबई: ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बंद असलेली ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे तसेच इतर सर्व योजनांच्या प्रगतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष रहावे, अशा सूचना कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत.
कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षात डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.
बैठकीत माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या संकल्पनेवर करावयाच्या कामांचा आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना, जल जिवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला व बाल विकास विभागाच्या योजना, ग्रामपंचायत विभागाकडील योजना, समाजकल्याण विभागाकडील योजना इ. योजनांचा आयुक्तांनी आढावा घेतला.
यावेळी सर्व जिल्हयांमार्फत आपल्या कार्यक्षेत्रात माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत जुन व जुलै, २०२३ दरम्यान केलेली कामे तसेच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये करावयाच्या कामांबाबत सादरीकरण करण्यात आले. घरकूल योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडया व शाळा यांना भेटी देऊन क्षेत्रिय कामकाजाचा आढावा घेण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले.