मयूरच्या मृत्यूला कॉलेज प्रशासनही जबाबदार
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 15, 2024 03:42 PM2024-07-15T15:42:40+5:302024-07-15T15:42:48+5:30
नेरुळ येथे राहणारा मयूर डमाळे (१७) हा वाशीतील फादर एग्नल कॉलेजमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली होती.
नवी मुंबई : वाशीतील फादर एग्नल कॉलेजमद्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी अखेर प्रशासनावर देखील कारवाई निश्चित झाली आहे. तरणतलावात प्रशिक्षण घेताना मयूर डमाळे (१७) याचा बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशिक्षक व गार्ड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पालकांनी आंदोलन केले होते.
नेरुळ येथे राहणारा मयूर डमाळे (१७) हा वाशीतील फादर एग्नल कॉलेजमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली होती. त्याच्या मृत्यूनंतर पालकांनी केलेल्या पाठपुराव्यात अनेक बाबींचा उलगडा झाला होता. त्यामध्ये मयूरच्या मृत्यूला संबंधित सर्वांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर येत होते. शिवाय दुर्घटना घडल्यानंतर देखील शाळा प्रशासनाकडून मयूरच्या पालकांची भेट घेण्याचे टाळले जात होते. त्यावरून संतप्त झालेल्या मयूरचे पालक व त्यांच्या समर्थकांनी २० जूनला कॉलेजवर मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांची देखील भेट घेऊन शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
वाशी पोलिसांनी घटनेचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करताना त्यामध्ये प्रशासनाला देखील दोषी धरले आहे. घडलेल्या दुर्घटनेला प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याने गुन्ह्यात प्रशासनाचाही उल्लेख केला गेला असल्याचे पोलिस निरीक्षक संजय नाळे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षक व गार्ड यांच्यानंतर कॉलेज प्रशासनाच्या वतीने प्राचार्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. तर पालकांच्या मागणीनुसार पोलिसांनी तपासात घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल मयूरच्या आई दीपाली डमाळे यांनीही समाधान व्यक्त केले आहे.