आयुक्तांनी केली नालेसफाईची पाहणी अद्ययावत सफाईसाठी नाला मॅपिंग यंत्रणेचा वापर
By वैभव गायकर | Published: May 6, 2024 09:28 PM2024-05-06T21:28:13+5:302024-05-06T21:28:25+5:30
स्वच्छता व घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल: यावर्षी भरपूर पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवरती नुकतीच मान्सुनपूर्व पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील नाले सफाईची पाहणी करून कामकाजाचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी घेतला.अद्ययावत नाला मॅपिंग यंत्रणेचा वापर याकरिता केला जाणार आहे. यावेळी स्वच्छता व घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात सुमारे 255 किलोमीटरचे 1 हजार 127 लहान नाले आहेत. त्याचबरोबर 60 किलोमीटरचे 105 मोठे नाले आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनपूर्व पाऊस येत असल्याने त्याआधी नाले सफाईची सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी तळोजा मधील मन्नान कॉलनी, खारघरमध्ये कोपरा ब्रीज, बेलपाडा, कामोठ्यातील नौपाडा, नवीन पनवेलमधील बालभारतीच्या मागील नाल्याची पहाणी केली. यावेळी 31 मे पूर्वी सर्व नाल्यांची सफाई कामे पूर्ण होण्याच्या सूचना आयुक्तांनी आरोग्य विभागास दिल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यांत्रिक पध्दतीने चारही प्रभागातील नालेसफाईला सुरूवात झाली असून, जवळपास 30-40 टक्के काम पुर्ण होत आले आहे.
नालेसफाईबरोबरच शहरातील छोट्या-मोठ्या गटारीच्या साफसफाईचे कामही जोमाने सुरू आहे. आयुक्तांनी या पहाणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळाची योग्यरित्या विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगून , उर्वरीत नालेसफाईची कामे वेगाने करण्याच्या सूचना करण्याच्या सुचना संबधित विभागास दिल्या. चौकट - यावर्षी आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने नालेसफाईसाठी गुगल अर्थच्या साह्याने अत्याधुनिक ‘नाला मॅपिंग’ यंत्रणा सुरू केली आहे.