तक्रारदारालाच पोलिस ठाण्यात जबर मारहाण; सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 20, 2023 08:35 AM2023-01-20T08:35:46+5:302023-01-20T08:44:43+5:30
एक प्रकरणात आयुक्तांकडे तक्रार केल्याचा राग
नवी मुंबई : मारहाण प्रकरणात चायनीस चालकाला पाठीशी घालत जखमी तरुणालाच पोलिस ठाण्यात जबर मारहाण केल्याप्रकरणी सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. कळंबोली पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. मात्र तरुणाचा जबाब नोंदवून देखील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जात नव्हता. अखेर संबंधितांनी सह आयुक्तांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली असता गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला.
कळंबोली येथे राहणाऱ्या विकास उजगरे याच्यासोबत 6 जानेवारीला हा प्रकार घडला आहे. तो त्याच्या मित्रांसोबत चायनीस सेंटरवर गेला होता. त्याठिकाणी एका मित्राचा वेटरसोबत वाद होऊन भांडण झाले होते. त्यांनतर सर्वजण तिथून निघून गेले असता, एका मित्राची राहिलेली बॅग घेण्यासाठी विकास पून्हा चायनीस सेंटरवर गेला होता. यावेळी तिथे त्याला चायनीस सेंटर चालक व इतर कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे विकास याने पोलिसांच्या कंट्रोलवर फोन करून मदत मागितली होती. यानंतर तिथे आलेल्या पोलिसांनी चायनीस सेंटरवरील दोन कामगार व विकास यांना कळंबोली पोलिस ठाण्यात नेले होते. मात्र त्याठिकाणी उपस्थित सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांनी विकास यालाच मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करत शौचालयाबाहेर उभे केले.
शिवाय ज्यांनी मारहाण केली त्यांचीच विकास विरोधात तक्रार घेऊन पाठवून दिले. दरम्यान विकास याला झालेल्या मारहाणीमुळे त्याच्या पोटात दुखू लागले असता त्याने रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. यानंतरही रात्रभर त्याला पोलिस ठाण्यातच ठेवून दिनेश पाटील मारहाण करत राहिले. अखेर पहाटेच्या सुमारास एका अधिकाऱ्याने दिनेश हा एका उपायुक्तांच्या नातेवाईक लागतो असे सांगितल्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्याला रुग्णालयाबाहेर सोडून देण्यात आले.
चायनीस सेंटरवर व त्यानंतर पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने विकासावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्याची कोणाविरोधात तक्रार नसल्याच्या अर्जावर देखील बळजबरीने सही घेण्यात आली होती. अखेर रुग्णालयातून सुटल्यानंतर त्याने घडलेल्या घटनेची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार सहायक आयुक्तांनी त्याचा जबाब देखील घेतला होता. मात्र सहायक निरीक्षक दिनेश पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात चालढकल केली जात होती.
अखेर तक्रारदार यांनी गुरुवारी ऍड स्वप्नील जगताप, ऍड सिद्धार्थ इंगळे, ऍड अक्षय गवळी, ऍड हेमंत शिंदे यांच्यासह थेट पोलिस आयुक्तालय गाठले. त्याठिकाणी सह आयुक्त संजय मोहिते यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी रात्री दिनेश पाटील विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास याने यापूर्वी एका प्रकरणात कळंबोली पोलिसांची आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याच्या रागातून दिनेश पाटील यांनी चायनीस चालकाला पाठीशी घालत दिनेश यालाच अमानुष मारहाण केल्याचे समजते.