घुसखोर, स्थानबद्ध विदेशींचा सांभाळ करण्याची कटकट होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:36 AM2024-07-27T06:36:00+5:302024-07-27T06:36:08+5:30

मुंबई, नवी मुंबईत होणार स्थानबद्धता केंद्र, ५७ कोटींचा खर्च

The conspiracy to deal with infiltrators, stationed foreigners will be removed | घुसखोर, स्थानबद्ध विदेशींचा सांभाळ करण्याची कटकट होणार दूर

घुसखोर, स्थानबद्ध विदेशींचा सांभाळ करण्याची कटकट होणार दूर

- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : व्हिसाची मुदत संपुष्टात येऊनही, तसेच विविध गुन्ह्यांत कारागृहातून मुक्त झालेल्या विदेशी नागरिकांना आता नवी मुंबईत  येथे कायमस्वरूपी, तर मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात तात्पुरते स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत राज्यात असे केंद्र उपलब्ध नसल्याने स्थानबद्ध करण्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात अडचणी निर्माण होत आहेत, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होत आहे. सद्य:स्थितीत राज्यात कोठेही अशा परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी सुयाेग्य सोय वा केेंद्र नाही. यामुळे विविध प्रकारांतील परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करताना अनेक अडचणी निर्माण होऊन त्या त्या देशांशी असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर विपरीत  परिणाम होतो. यामुळे देशाच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची भीती असते.

सामाजिक न्याय विभागाकडे संचालन
मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणच्या स्थानबद्धता केंद्रांचे संचालन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी २६९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यात तात्पुरत्या केंद्रासाठी ६५ कर्मचाऱ्यांकरिता २.६४ कोटी, तर कायमस्वरूपी केंद्रासाठीच्या २०४ कर्मचाऱ्यांसाठी ८.४४ कोटींच्या खर्चासही मंजुरी दिली आहे.

मुंबईत ८०, नवी मुंबईत २१३ विदेशींची सोय
विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उशिरा का होईना, आता मुंबईच्या भोईवाडा मध्यवर्ती  कारागृहात ८० विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील, तर राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक ११, बाळेगाव, नवी मुंबई येथे २१३ विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्र सुरू करण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे.

कायमस्वरूपी केंद्राची इमारत ४६ कोटींची
कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्राच्या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडून करावयाचे असून, त्यासाठी ४६ कोटी खर्च येणार आहे.

कोणत्या विदेशी नागरिकांना करणार स्थानबद्ध
व्हिसा मुदत संपुष्टात आलेले विदेशी नागरिक, कारागृहातूून शिक्षा भोगून मुक्त झालेले विदेशी नागरिक, तसेच विविध कारणांस्तव  मायदेशी परत न गेलेल्या विदेशी नागविकांसह पारपत्राविना देशात घुसखोर केलेल्या विदेशींना स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

विदेशींचा सांभाळ करताना येणाऱ्या अडचणी
जगातील प्रत्येक देशाची भाषा, धर्म, रीतिरिवाज, पोशाख, अन्न वेगवेगळे आहे. यामुळे विदेशींना अटक केल्यावर किंवा त्यांना काही  कारणास्तव स्थानबद्ध करायचे झाल्यास सर्वांत आधी अडचण येते ती भाषेची. शिवाय धार्मिक रीतिरिवाज, पोशाख, अन्नधान्य पुरविताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्या-त्या देशांच्या दूतावासाशी संपर्क साधून या स्थानबद्ध केलेल्या विदेशी  नागरिकांशी संपर्क सोडविणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, तसेच त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविणे या स्थानबद्धता केंद्रामुळे सोपे होणार आहे. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासही मदत होणार आहे.

Web Title: The conspiracy to deal with infiltrators, stationed foreigners will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग