रसिकांचे सहकार्य हेच विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक - प्रशांत दामले

By योगेश पिंगळे | Published: November 9, 2022 06:52 PM2022-11-09T18:52:53+5:302022-11-09T18:53:07+5:30

नाट्यप्रयोगांचे विक्रमवीर दामले यांचा नवी मुंबईकरांतर्फे विशेष सन्मान

The cooperation of enthusiasts is the real secret behind record attempts - Prashant Damle | रसिकांचे सहकार्य हेच विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक - प्रशांत दामले

रसिकांचे सहकार्य हेच विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक - प्रशांत दामले

Next

नवी मुंबई : मराठी नाटकांवर भरभरून प्रेम करणारी रसिक माणसे ही ऊर्जा असून ३२ वर्षात १२५०० प्रयोग करू शकलो. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार लाभले तसेच रसिकांचा कायम आशिर्वाद लाभला हेच या विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक असल्याचे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात दामले यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्रात ५२ ठिकाणी नाट्यप्रयोग होऊ शकतात, त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे विष्णुदास भावे नाट्यगृह स्वच्छता आणि सुविधांच्या दृष्टीने टॉप फाईव्हमध्ये असून त्यासाठी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या  सहका-यांच्या नियमित जागरूकतेबद्दल दामले यांनी गौरवोद्गार काढले. भावे नाट्यगृह उत्तम आहेच त्या सोबतच नाटक कसे बघायचे हे उत्तमरित्या कळणारे नाट्यरसिक इथे आहेत असा विशेष उल्लेख त्यांनी केला. आपल्या ३९ वर्षांच्या रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीत १२५०० प्रयोगांचा टप्पा पार करण्याचा अनोखा विक्रम करणारे सुप्रसिध्द अभिनेते दामले यांचा १२५०३ व्या प्रयोगाप्रसंगी विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या हस्ते शाल, पुणेरी पगडी व सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान कऱण्यात आला. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा हाऊसफुल्ल नाट्यप्रयोगाप्रसंगी संपन्न झालेल्या या गौरवाप्रसंगी नाटकातील सहकलावंत कविता मेढेकर, अतुल तोडणकर, पूर्वा भिडे, अतुल तोडणकर, राजसी चिटणीस, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांनाही सन्मानीत करण्यात आले. यावेळी दामले यांचे समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत त्यांच्या आगामी कारकिर्दीला शुभेच्छा देण्यात आल्या.

‘टुरटूर’ या नाटकापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात
१९८३ साली ‘टुरटूर’ या नाटकापासून आपल्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या दामले यांनी आपल्या ३९ वर्षांच्या नाट्यकारकिर्दीत १२५०० हून अधिक नाट्यप्रयोग केले. या विक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोद्य यांच्या हस्ते त्यांच्या कारकिर्दीचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे १२५०० व्या प्रयोगाप्रसंगी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून विशेष गौरव करण्यात आला. सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लॉगवरून मराठी रसिकांना नाटकांवर प्रेम करायला लावण्यात प्रशांत यांचे  मोठे योगदान असल्याचे लिहीत त्यांच्या कामाचा मी चाहता असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: The cooperation of enthusiasts is the real secret behind record attempts - Prashant Damle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.