वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: महानगरपालिका हद्दीतील खारघर सेक्टर 14 येथील स्मशानभूमीत दि.27 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास गेट बंद असल्याने द्रौपदी सारंग यांचा अंत्यविधी एक दिवस खोळंबल्याचा आरोप त्यांचे जावई संतोष सावंत यांनी केला आहे.याप्रकाराच्या चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये राहणाऱ्या द्रौपदी सारंग यांचा दि.27 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास मृत्यू झाला.यावेळी डॉक्टरांकडून सर वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्र घेऊन संतोष सावंत हे रात्री 10.30 वाजता अंत्यविधीच्या चौकशीसाठी स्मशानभूमीवर गेले. यावेळी त्यांना स्मशानभूमीचा गेट बंद दिसला.गेटला कुलूप लागलेला असताना सावंत यांनी आवाज देखील दिला.मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी २८ रोजी पहाटे 5.30 वाजता देखील हीच परिस्थिती होती.दरम्यान सकाळी 11 च्या सुमारास हा अंत्यविधी पार पडला.घडलेला सर्व प्रकार सावंत यांनी शिवसेनेचे (उबाठा ) चे शहरप्रमुख गुरुनाथ पाटील यांना सांगितले.त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.यासंदर्भात कारवाईची मागणी गुरुनाथ पाटील यांनी केली आहे.स्मशानभूमीचा गेट बंद असल्याने अंत्यविधीसाठी 12 तासाचा उशीर झाल्याने तोपर्यंत मृतदेह आम्हाला घरातच ठेवावा लागल्याचा आरोप मृताचे नातेवाईक असलेले संतोष सावंत यांनी केला आहे. चौकट - सदरची स्मशानभूमी रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद असल्याचे आम्हाला समजले.स्मशानभूमीसाठी असे वेळेचे निर्बंध कशासाठी ? याप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी आम्ही पालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी केली आहे.