Navi Mumbai: चालकाला लुटल्याने पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा, चौकशीच्या बहाण्याने उकळले होते तीन हजार रुपये
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 8, 2024 08:51 PM2024-10-08T20:51:22+5:302024-10-08T20:51:55+5:30
Navi Mumbai News: पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी थांबवून कारवाईचा धाक दाखवून तीन हजार रुपये उकळल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तीन पोलिसांवर नेरुळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी थांबवून कारवाईचा धाक दाखवून तीन हजार रुपये उकळल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तीन पोलिसांवर नेरुळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही पोलिस मुख्यालयात नेमणुकीवरील असून गणवेशात असताना त्यांनी हा प्रकार केला आहे.
नेरुळ सेक्ट १९ येथे सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो या मार्गाने चालला होता. त्यावेळी गणवेशात असलेले पोलिस कर्मचारी स्वप्नील देवरे, विशाल दखणे व सचिन बोरकर यांनी चौकशीसाठी टेम्पो थांबवला. यावेळी चालकाचा वाहन परवाना, पीयूसी व इतर कागदपत्रे त्यांनी तपासली. त्यात त्रुटी असल्याचे सांगून टेम्पो चालक विक्रम खोत यांना कारवाईचा धाक दाखवला. यानंतर त्यांच्याकडून दंड स्वरूपात तीन हजार रुपये ऑनलाईन घेतले. मात्र दंडाची रक्कम घेऊनही त्यांना कोणत्याही प्रकारची पावती देण्यात आली नाही. यामुळे खोत यांनी झालेल्या लूट प्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून रात्री उशिरा तिघा पोलिसांवर नेरुळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान तिघांनी केलेला हा पहिलाच गुन्हा आहे ? कि इतरही चालकांना त्यांनी अशाप्रकारे लुटले आहे ? याचा तपास नेरुळ पोलिस करत आहेत. मात्र मुख्यालयात नेमणुकीवर असतानाही तिघेही गणवेशात उरण फाटा मार्गावर काय करत होते ? असाही प्रश्न निर्माण होत आहे. परंतु या प्रकारामुळे शहरात वाहन चालकांना अडवून कारवाईच्या बहाण्याने होत असलेली आर्थिक पिळवणून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.