समाजसेवेचा तीन पिढ्यांचे संस्कार जोपासणारे धर्माधिकारी कुटुंब पहिलेच; अमित शहा यांनी केलं कौतुक
By वैभव गायकर | Published: April 16, 2023 03:30 PM2023-04-16T15:30:34+5:302023-04-16T15:34:40+5:30
महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2022 अप्पासाहेब धर्माधिका-यांना प्रदान
पनवेल: मी 12 वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे.इतिहासाचा विद्यार्थी राहिलो आहे.देशविदेशातील इतिहासाचा मी अभ्यास केला आहे.अनेक कुटुंबावर माता सरस्वती,लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो.त्यानुसार ते कुटुंब वाटचाल करतात मात्र समाजसेवेचा वारसा तब्बल तीन पिढ्या जोपासणारे धर्माधिकारी कुटुंब मी पहिल्यांदाच पाहत असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले.दि.16 रोजी खारघर याठिकाणी आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वितरित करताना ते बोलत होते.
कोणताही प्रसिद्धीचा लवलेश न ठेवता आपले सामाजिक कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.त्यांच्या समाजसेवेच्या सन्मानार्थ जमलेली गर्दी हे त्यांच्या कार्याचा गौरव असुन अशी गर्दी देखील मी माझ्या आयुष्यात पाहिली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.आप्पासाहेबांच्या सन्मानासाठीच मी थेट दिल्ली वरून याठिकाणी दाखल झालो असल्याचे शहा म्हणाले.खारघर मधील या सोहळ्याला जवळपास वीस लाखांचा जनसमुदाय लोटला होता.अतिशय शिस्तबद्ध नियोजनात श्री सदस्यांचे देखील अमित शहा यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र महापुरुषांचा वारसा लाभला असल्याचे सांगत, आप्पासाहेबांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या अनुयानांना देखील एकप्रकारे सन्मानित केले आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाचे देखील शहा यांनी कौतुक केले.या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषनाची सुरुवात करताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उभा नसल्याचे सांगत एक श्री सदस्य म्हणुन उभा राहिलो असल्याचे सांगितले.
आमच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात आम्हाला सावरण्यात धर्माधिकारी कुटुंबाचा देखील मोठा वाटा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.दुःखातून सावरण्याचा ज्या प्रकारे मला धर्मवीर आनंद दिघे यांनी मला साथ दिली.तसेच धर्माधिकारी कुटुंबांनी देखील आमच्या कुटुंबाला दुःखातुन बाहेर काढण्यास मदत केली.अध्यात्माची शक्ती मोठी असते.राजकीय अधिष्ठानाला अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड आणि प्रेरणा लागते त्याचीच आज प्रचिती प्रचंड जनसमुदायामुळे आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.भर उन्हात एकही श्री सदस्य जागेवरून उठत नसुन हीच अप्पासाहेबांची ताकद आहे.याच्यातूनच बैठकीची शिस्त दिसत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे जगातील आठव आश्चर्य असल्याचे सांगत प्रत्येक कार्यक्रमात मला याची प्रचिती येत असल्याचे फडणवीस म्हणाले.मन स्वच्छ करण्याची कला आप्पासाहेबांच्या शब्दात असल्याचे फडणवीस म्हणाले.आप्पासाहेब महाराष्ट्र भुषण आहेतच.नाना साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना हा पुरस्कार मिळाला असल्याने हा विलक्षण योगायोग असल्याचे फडणवीस यांनी यावेळी संगीतले.शहा यांच्या हस्ते आप्पासाहेबाना पुरस्कार वितरित करण्यात आला.25 लाखांचा धनादेश,मानपत्र,शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या सोहळ्याला सचिनदादा धर्माधिकारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील,राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,मंत्री उदय सामंत,मंत्री शंभूराज देसाई,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,खासदार श्रीरंग बारणे,रवींद्र चव्हाण,आमदार प्रशांत ठाकुर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या तीन धारा -
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्याचे सांगत महाराष्ट्र तीन धारेत नेहमी वाहत राहिले असल्याचे सांगत पहिल्या धारेत शिवाजी महाराजांच्या वीरतेचे उदाहरण देत त्यांचे कार्य वीर सावरकर,वासुदेव बळवंत फडके,चाफेकर बंधू आणि लोकमान्य टिळकांचे नाव घेतले.दुसऱ्या धारेत भक्तीचे उदाहरण देत समर्थ रामदास,तुकाराम महाराज,संत नामदेवांचे उदाहरण दिले.तिसऱ्या धारेत सामाजिक चेतनेचे उदाहरण देत महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ भीमराव आंबेडकर आदींचे उदाहरण देत महाराष्ट्र भूमीचे कौतुक केले.
श्री सदस्यांमध्ये बसुन श्रीकांत शिंदेनी पहिला कार्यक्रम -
खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या आई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी श्री सदस्य असल्याने भर उन्हात श्री सदस्यांमध्ये बसुन या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात याबाबत माहिती दिली.
आमच्या कार्याची सुरुवात नानासाहेबांनी 1943 साली खेडेगावातून केली.आमच्या कार्याची आम्हाला कधीही जाहिरात करण्याची गरज भासली नाही.मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे याच विचाराची पेरणी आम्ही बैठकीतुन करत असतो.कार्य हे श्रेष्ठ आहे.नानासाहेबांनी वयाच्या 87 वर्षापर्यंत आमचे मानवतेचा कार्य चालु ठेवले.मी देखील शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य पुढे नेणार आहे.हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नानांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करत आहे.प्रत्येक पुरस्कार महत्वाचा असतो.महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकाच कुटुंबाला दोन वेळा मिळाल्याची हि पहिलीच वेळ आहे.आमच्यासाठी हि भाग्याची गोष्ट असुन महाराष्ट्र शासनाला याबाबत धन्यवाद देतो.
- आप्पासाहेब धर्माधिकारी (महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 चे मानकरी)