नवी मुंबई : पामबीच मार्गावर नेरूळ येथील जलवाहतूक जेट्टीवर जाण्यासाठी बांधलेल्या रस्त्यामुळे भरतीचा प्रवाह रोखला गेल्यानेच डीपीएस तलाव कोरडा पडल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या खारफुटी संवर्धन समितीच्या चारसदस्यीय पथकाने काढला आहे. या पथकाने बुधवारी डीपीएस तलाव परिसराची पाहणी केली. त्यात तलावास जेट्टीचा परिसर, त्यासाठी बांधलेल्या ६०० मीटरचा बंधाऱ्यासह रस्त्यामुळे बुजले गेलेले चोक पॉइंटचा समावेश आहे. याबाबत नॅट कनेक्ट फाउंडेशनने तक्रार केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खारफुटी संवर्धन समितीच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने ही पाहणी केली.
चोक पॉइंट बुजविल्यानेच भरतीचा प्रवाह रोखला गेल्याने ३० एकर क्षेत्राचा डीपीएस तलाव काेरडा पडून फ्लेमिंगोंना अन्न मिळत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला होता. त्याला खारफुटी संवर्धन समितीच्या पथकाने पाहणी करून दुजोरा दिल्याने सिडकोचे बिंग फुटणार आहे. यामुळे खारफुटी संवर्धन समिती आता सिडकोवर कारवाई करण्यासंदर्भात काय भूमिका घेते व कोणती शिफारस करते याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करावयाचा असल्याने यावर कोणतेही भाष्य करण्यास या समितीने पाठविलेल्या पथकातील सदस्यांनी नकार दिल्याचे तक्रारदार नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
नवी मुंबईची जमीनमालक असलेल्या सिडकोने विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे तलाव क्षेत्र हे विकसित करण्यायोग्य क्षेत्र आहे, हे दर्शविण्यासाठी बफर झोन तयार केला असल्याचे नवी मुंबई पर्यावरण संरक्षण सोसायटीचे व्यवस्थापकीय समिती सदस्य संदीप सरीन यांनी सांगितले. तर भरतीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय आणू नये यासाठी केंद्र तसेच राज्याच्या पर्यावरण विभागांनीदेखील सिडकोला निर्देश दिले होते. या उल्लंघनासाठी सिडकोला जबाबदार धरले पाहिजे, असे ‘एनएमईपीएस’चे अध्यक्ष विरेंद्र कुमार गांधी यांनी सांगितले.आमदार गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तलावालगतचा बंधारा कापून भरतीचा प्रवाह तलावात येण्यासाठी तेथे ४५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे तलावात लवकरच भरतीचे पाणी येईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे करताना महापालिकेने या तलावातील घाण आणि गाळदेखील साफ करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणी तलावामध्ये प्रवेश करू शकेल, असे विरेंद्रकुमार गांधी म्हणाले.