दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात डंपर पलटला; सानपाडा येथील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 2, 2023 07:08 PM2023-11-02T19:08:44+5:302023-11-02T19:08:52+5:30
अपघातामध्ये थोडक्यात बचावले प्राण
नवी मुंबई : दुचाकीस्वाराने अचानक लेन बदलल्याने त्याचा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात खडीचा डंपर पलटी झाल्याची घटना सायन पनवेल मार्गावर सानपाडा येथील पुलावर घडली. या अपघातामध्ये डंपरमधील खडी रस्त्यावर सांडल्याने काही वेळासाठी वाहतुकीला अडथळा झाला होता. तर अपघातामध्ये थोडक्यात दोघांचे प्राण वाचले असून चालक जखमी झाला आहे.
सानपाडा येथील पुलाच्या सुरवातीलाच गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. खडी घेऊन मुंबईकडे जाणारा डंपर पुलालगत आला असता समोरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने अचानक लेन बददली. पुलाखालून जाण्यासाठी दुचाकी डावीकडे असताना डंपर पुलावर जाण्यासाठी उजवीकडून चालत होता. त्याचवेळी दुचाकीस्वाराने पुलावरून जाण्यासाठी त्याची मोटरसायकल अचानक उजवीकडे घेतली. यामुळे त्याला डंपरची धडक बसणार असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यामुळे डम्पर चालकाने डंपर वळवण्याचा प्रयत्न केला असता तो पलटी झाला. यामध्ये डम्पर चालक जखमी झाला असून दुचाकीस्वाराने प्राण थोडक्यात बचावले. या अपघातामुळे रस्त्यावर खडी सांडल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. अखेर तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या पथकाने अपघातस्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. तसेच अपघातग्रस्त डंपर मार्गातून हटवून वाहतुकीसाठी मार्ग खुला केला.