सानपाड्याच्या दत्त मंदिराचा वनवास संपणार, सेवा रस्त्यासह संरक्षक भिंत कात टाकणार
By नारायण जाधव | Published: February 9, 2024 04:26 PM2024-02-09T16:26:10+5:302024-02-09T16:26:19+5:30
श्रीदत्त मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यासह संरक्षक भिंतीची दुरवस्था झाल्याने त्यांच्या डागडुजीसाठी अनेक दिवस स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते.
नवी मुंबई : केवळ आमदार निधी आणि स्थानिक विकास कार्यक्रमातूनच नव्हे तर बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांसाठी पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाचा २० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. यातून पहिल्या टप्प्यात ४ कोटी खर्चून सानपाडा येथील श्रीदत्त मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यासह संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीदत्त मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यासह संरक्षक भिंतीची दुरवस्था झाल्याने त्यांच्या डागडुजीसाठी अनेक दिवस स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. कारण दत्त मंदिर हे जागृत देवस्थान असून तेथे मोठी यात्रा भरते. दत्त जयंतीसह दररोज अनेक भाविक दर्शनाला येतात. परंतु, काही दिवसांपासून श्री दत्त मंदिरामध्ये जत्रेसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना रस्ता हा अरुंद पडत असे. त्यामुळे भाविकांना गाड्या ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन सानपाडा ग्रामस्थांनी मंदाताई म्हात्रे यांच्याकडे निधीची मागणी केली होती.
तिची दखल घेऊन त्यांनी नवी मुंबई महापालिका वा सिडको नव्हे तर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून २० कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यातून पहिल्या टप्प्यात ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी सदानंद पाटील, बाळाराम पाटील, सोमनाथ वास्कर, दिलीप मढवी, महेश मढवी, भार्गव मढवी, रूपेश मढवी, अंबाबाई रघू दळवी, चांगूबाई चिंतामण वास्कर, लक्ष्मी वसंत ठाकूर या सानपाड्यातील ग्रामस्थांसह ओमप्रकाश पवार (उपविभागीय अभियंता बहुमजली इमारती बांधकाम उपविभाग क्र. १ तुर्भे), केशव कारगुडे (कनिष्ठ अभियंता), ऋषीकेश कासार (कनिष्ठ अभियंता), दिगंबर घाडी (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक) विजय आडबले (ठेकेदार) उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात सायन-पनवेलवर विकासकामे
सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटींचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यातील या ४ कोटींच्या कामानंतर दुसऱ्या टप्प्यात सायन-पनवेल मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी विकासकामे करण्यात येणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांसाठी पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला असल्याचे त्या म्हणाल्या.