- नामदेव मोरेउप-मुख्य उपसंपादकआरोग्यासाठी आहारातील फळांचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. कोरोनापासूनही आरोग्यविषयी जागरूकता वाढली असून, या सर्वांचा परिणाम फळांच्या मागणीवर झाला आहे. पूर्वी हंगामाप्रमाणे मिळणारी अनेक फळे आता वर्षभर मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागली आहेत. विदेशी फळांनाही मागणी वाढत असून दहा वर्षांत फळांची आयात तिप्पट वाढली आहे. मुंबईपासून खेडेगावापर्यंत प्रत्येक मार्केटमध्ये विदेशी फळेही उपलब्ध होऊ लागली आहेत.
नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे. यामुळे पूर्वी हंगामाप्रमाणेच फळे मार्केटमध्ये उपलब्ध होत होती. परंतु फळांचे आहारातील महत्त्व लक्षात आल्यामुळे वर्षभर त्याची मागणी वाढली. मागणीप्रमाणे पुरवठा करता यावा यासाठी फळांची शीतगृहात साठवणूक करण्यास सुरुवात झाली. शीतगृहात साठवलेल्या फळांचे आयुष्य दोन महिन्यापर्यंत वाढविणे शक्य होऊ लागले. यामुळे आता वर्षभर ग्राहकांना मुबलक फळे मिळू लागली. मागणी व पुरवठा यांचा मेळ साधण्यासाठी फळांची आयातही सुरू झाली. २००९ मध्ये देशात २८४३ कोटी रुपयांची फळे आयात झाली होती.
२०१३-१४ मध्ये हा आकडा ७७१५ कोटींवर पोचला. पुढील दहा वर्षांत यामध्ये तीनपट वाढ झाली असून, २०२३-२४ या वर्षात आयात फळांची उलाढाल २२६६३ वर पोचली आहे. सफरचंद, संत्री, किवी, द्राक्ष,पिअर्स, अवाकडूसह १५ पेक्षा जास्त प्रकारच्या फळांची आयात होत आहे.
विदेशी फळांविषीय ग्राहकांमध्येही प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या मार्केटिंगवरही विशेष लक्ष दिले जाते. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू व मलेरियाची साथ प्रचंड वाढते. या काळात शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी किवी व ड्रॅगन फ्रूट उपयुक्त असल्याची मार्केटिंग पद्धतशीरपणे करण्यात आले आहे. यामुळे किवीला मागणी वाढली असून गतवर्षी उलाढाल ४२२ कोटींवर पोचली आहे. किवीप्रमाणेच पपईचाही डेंग्यू, मलेरियाच्या आजारात उपयोग होतो. पण त्याविषयी योग्य मार्केटिंग होत नाही. विदेशी सफरचंदची उलाढालही ३ हजार कोटींवर पोहोचली आहे. आकर्षक पॅकिंग व विदेशी फळांविषयी आकर्षण यामुळे ग्राहकांकडूनही या फळांना पसंती मिळते. देशातील एकूण आयात फळांमध्ये २० ते २५ टक्के वाटा फक्त मुंबईचा आहे. जेएनपीटी बंदर व हवाई मार्गाने फळे मुंबईत येतात व येथून संपूर्ण राज्यात त्याचे वितरण केले जात आहे.
फळांची साठवणूक करण्यासाठी नवी मुंबई, तळोजा व इतर राज्याच्या विविध भागांत शीतगृहांची साखळी उपलब्ध आहे. शीतगृहामध्ये साठवणूक केल्यामुळे फळे सडण्याचे प्रमाणही नगण्य झाले आहे. आरोग्यासाठी व रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यामध्ये फळांचा उपयोग होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. डॉक्टरही आजारपणात फळे खाण्याचा सल्ला देत असल्यामुळे देशी फळांबरोबर विदेशी फळांना मागणी वाढत आहे.