‘एनएमपीएल’चे पाचवे पर्व मात्तबर १६ संघ गाजवणार
By कमलाकर कांबळे | Published: December 13, 2023 08:25 PM2023-12-13T20:25:23+5:302023-12-13T20:25:36+5:30
खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण, क्रिकेट सामन्यांचा १७ जानेवारीपासून थरार.
नवी मुंबई : नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएलच्या पाचव्या पर्वासाठी बुधवारी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या लिलाव प्रक्रियेत नवी मुंबईतील २४० क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घेतला असून, मातब्बर १६ संघांत १७ जानेवारीपासून क्रिकेटचा थरार अनुभवयास मिळणार आहे.
नवी मुंबईतील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सहकार्याने नवी मुंबई प्रीमियर लीगची सुरुवात करण्यात आली. कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. माजी नगरसेवक लीलाधर नाईक, एनएमपीएल कमिशनर दीपक पाटील, स्वप्निल नाईक, ओमकार नाईक, नीलेश पाटील, प्रतीक पाटील, विकी भोईर, भूषण पाटील, समालोचक कुणाल दाते आदी यावेळी उपस्थित होते.
नवी मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान
दरम्यान, यावेळी अध्यात्माची परंपरा समर्थपणे पुढे नेणारे भजन सम्राट महादेव बुवा शाबाजकर, आयपीएल गाजवणारा नवी मुंबईचा क्रिकेटपटू अमन खान, टेनिस बॉल स्टार क्रिकेटपटू भूषण पाटील आणि संस्कृती आणि परंपरा जपणारे दिवाळे ग्रामस्थ बहिरी देव मंडळ यांचा नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हेल्दी नवी मुंबई फिट नवी मुंबई
एनएमपीएल स्पर्धेच्या माध्यमातून या वर्षी ‘हेल्दी नवी मुंबई, फिट नवी मुंबई’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास आणि अन्य विविध कारणांमुळे आलेले नैराश्य दूर करण्यासाठी मुलांबरोबरचा संवाद वाढला पाहिजे. त्यासाठी मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन गरजेचे आहे. खेळाच्या माध्यमातून याबाबतची जनजागृती उत्तम प्रकारे होऊ शकते. त्यानुसार येत्या काळात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या वेळी दिली.