नवी मुंबई : नवी मुंबई शहरात उंच-उंच इमारतीचे प्रमाण वाढत असून, आगीच्या दुर्घटनेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ६८ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल होणार आहे. याचा वापर आग शमविणे व रेस्क्यू करणे यासाठी होणार आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
नवी मुंबई शहरातील लहान रस्त्यावरील उंच इमारतीतील अग्निविमोचनासाठी ३२ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन आणि अशी दोन वाहनेदेखील खरेदी करण्यात येणार आहेत. मोठ्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता तसेच रासायनिक कारखाने यांची आग विझविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विदेशी बनावटीचे वॉटर मिस्ट टर्बाइन सिस्टीम वाहन खरेदी करणे प्रस्तावित आहे. हे वाहन पेट्रोलपंप, गोडाऊन, गॅस स्टेशन व बाजार क्षेत्रात लागणाऱ्या मोठ्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्याकरिता उपयोगी आहे. तसेच हवेतील धुळीवर नियंत्रण करण्याकरिता या वाहनाचा उपयोग होणार आहे.