आंब्याच्या पहिल्या पेटीचा मान हापूसऐवजी ‘केसर’ला; APMC मार्केटमध्ये आज होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:59 IST2025-01-06T12:57:23+5:302025-01-06T12:59:02+5:30
देवगडमधील वाघोटनमधून येणार आंबा

आंब्याच्या पहिल्या पेटीचा मान हापूसऐवजी ‘केसर’ला; APMC मार्केटमध्ये आज होणार दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६ जानेवारीला देवगडमधून आंब्याची पहिली पेटी दाखल होत आहे. हापूसपासून या हंगामाचा मुहूर्त होत असतो. मात्र यावर्षी हा मान ‘केसर’ आंब्याला मिळणार आहे. तसेच नियमित आवक मार्चमध्येच होण्याची शक्यता आहे.
आंबा हंगामामध्ये मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या पहिल्या पेटीची विधिवत पूजा करून त्याची विक्री केली जाते. गतवर्षीच्या हंगामामध्ये १७ नोव्हेंबरमध्येच पहिली पेटी दाखल झाली होती.
दीड महिना उशीर
यावर्षी दीड महिना उशीर झाला आहे. सोमवारी देवगडमधील वाघोटन गावातील शकील मुल्ला या शेतकऱ्याच्या बागेतून आंब्याची पहिली पेटी मुंबई बाजार समितीमध्ये दाखल होणार आहे. पाच डझन आंबा विक्रीसाठी येणार असून, त्याला किती भाव मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हापूसऐवजी केसर आंबा मुहूर्ताला बाजार समितीमध्ये येत आहे.
आंब्याची पेटी दाखल होत असली तरी हंगाम उशिरा सुरू होणार आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची थोडी आवक सुरू हाेईल. १० मार्चपासून आवक वाढेल. १५ ते २० मार्चपासून मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होईल.
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट