Flotel: नवी मुंबईत हाेणार पहिले ‘फ्लोटेल’, बेलापूर-उलवे खाडीची केली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:07 AM2022-09-02T04:07:51+5:302022-09-02T04:13:03+5:30
Flotel: नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरात लवकरच फ्लोटेल अर्थात तरंगते फिरते हॉटेल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई-नवी मुंबईतील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मेरी टाईम बोर्डाने व्यक्त केला आहे.
- नारायण जाधव
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरात लवकरच फ्लोटेल अर्थात तरंगते फिरते हॉटेल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई-नवी मुंबईतील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मेरी टाईम बोर्डाने व्यक्त केला आहे.
सध्या हा प्रकल्प निविदास्तरावर आहे. या तरंगत्या फिरत्या हॉटेलसाठी अनुभवी आणि पात्र इच्छुक भागीदारांच्या शोधासाठी मेरी टाइम बोर्डाने स्वारस्य अभिकर्त्यांसाठी देकार मागविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘फ्लोटेल’ हे नाव ‘फ्लोट’ आणि ‘हॉटेल’ या शब्दांचे एकत्रीकरण आहे. असे हॉटेल असते जे नद्या, सरोवरे, बंदर आणि महासागरांत एकतर तरंगते असते किंवा फ्लोट म्हणजे त्या परिसरात पाण्यावर फिरणारे असते. कायमस्वरुपी नांगरलेली जहाजे किंवा विशिष्ट मार्गांवर ही हॉटेलरुपी जहाजे परिसरात फिरत असतात. अशी ही ‘फ्लोटेल’ सर्वप्रथम १९७० आणि ८० च्या दशकात चीन आणि हाँगकाँगमध्ये लोकप्रिय झाल्याने नंतर कालौघात ती जगभर पसरली.
...म्हणून केली नवी मुंबईची निवड
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहर जवळ येणार आहे. घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहे. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी बेलापूर-उलवे खाडीची निवड केली.
बेलापूर जेट्टीवरून पर्यटकांची ने-आण
बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरातील नियोजित ‘फ्लोटेल’वर पर्यटकांची ने-आण करण्यासाठी बेलापूर जेट्टीवरून केली जाणार आहे. या जेट्टीचा वापर लवकरच मुंबई-नवी मुंबईसह ठाणे-कल्याण-मीरा-भाईंदर-वसईपर्यंतच्या जलवाहतुकीसाठीही होणार आहे.
राज्य सरकारचा ‘फ्लोटेल’ हा खूप चांगला प्रकल्प आहे. यातून नवी मुंबईचे नाव पर्यटन स्थळांच्या यादीवर जाईलच शिवाय नवी मुंबई महापालिकेलाही महसूल मिळेल. तो लवकरात लवकरात पूर्ण व्हावा यासाठी आता प्रयत्न राहिल.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर