नियमांचे पालन करा, अन्न व औषध प्रशासनाची औषधी विक्रेत्यांना तंबी
By योगेश पिंगळे | Published: August 23, 2023 07:48 PM2023-08-23T19:48:07+5:302023-08-23T19:48:22+5:30
नियमांचे पालन करण्याच्या सूचना
नवी मुंबई : रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न मेडिकल दुकानातून औषधी खरेदीसाठी सक्ती न करण्याचे तसेच याबाबत मेडिकलच्या दर्शनी भागात फलक बसविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने परीपत्रकाच्या माध्यमातून यापूर्वीच दिले आहेत. परंतु शहरात या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे वृत्त 'लोकमत' ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त रोहित राठोड यांनी शहरातील रुग्णालय संलग्न मेडिकल दुकानदारांना कारवाईचे संकेत दिले होते. तसेच याबाबत मंगळवारी रुग्णालयातील मेडिकल दुकानचालकांची बैठक घेत नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.
रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी त्या रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकल दुकानातून घेण्याची सक्ती केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी पारिपत्रक काढून औषधी खरेदीसाठी रुग्णांना सक्ती न करण्याचे तसेच रुग्णालयाशी संलग्न मेडिकल दुकानाच्या दर्शनी भागात याबाबतचे फलक बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होते का? हे पाहण्यासाठी लोकमत ने रियालिटी चेक केले होते. मात्र काही रुग्णालयातील मेडिकल दुकानात कोणतेही फलक बसविण्यात आले नसल्याचे तसेच रुग्णांना औषधी खरेदीसाठी सक्ती केली जात असल्याचे 'लोकमत' च्या रियालिटी चेकमध्ये आढळून आले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त राठोड यांनी शहरातील रुग्णालय संलग्न मेडिकल दुकानचालकांना कारवाईचे संकेत दिले होते. घटनेतील गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मंगळवारी सानपाडा येथील केमिस्ट भवन येथे बैठक घेतली यावेळी नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रशासनाचे अधिकारी, नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि नवी मुंबईतील रुग्णालय संलग्न मेडिकलचालक उपस्थित होते.