नवी मुंबई : येथील ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील जुईनगर येथील रहेजा समूहाच्या टाऊनशिपमध्ये मे. ग्रामरसी ट्रेड इंडस्ट्रिजच्या टाऊनशिपमध्ये गोल्ड क्राफ्ट पार्क स्थापण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली प्राथमिक संमती दिली आहे. यामुळे येथे सुमारे ६६ हजार ६५ चौ. मी. क्षेत्रावर गोल्ड क्राफ्ट पार्क बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे कंपनी सुमारे १८९५ कोटी रुपये खर्चून दोन लाख २६ हजार ९०७.४४ चौ. मी. क्षेत्राचे विस्तीर्ण बांधकाम करून हे गोल्ड पार्क साकारणार आहे.
हे एकात्मिक गोल्ड क्राफ्ट पार्क पंचशील रियल्टी विकसित करणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत ही संमती दिली आहे. १३ हजार लोकांना कायमस्वरूपी रोजगार या गोल्ड क्राफ्ट पार्कमध्ये बांधकामादरम्यान येथे एक लाखावर लोकांना तात्पुरता तर १३ हजार लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. यात हिऱ्यांना पैलू पाडणारे कारागीर, सोन्याचे दागिने घडविणारे कारागीर आणि अन्य कामगारांचा समावेश आहे.
रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसह विमानमार्ग जवळ
गोल्ड क्राफ्ट हे नवी मुंबई येथील जुईनगर येथे मुंबई-पुणे महामार्गापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. त्याला लागूनच रेल्वेचे जुईनगर स्थानक असून, शहरातील महापे इलेक्ट्रॉनिक झोनसह महापे येथे विकसित होणारे ज्वेलरी पार्कही जवळच आहे. राजधानी मुंबईच्या जवळ असल्यामुळे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि झवेरी बाजारासह मुंबई शहराशी अखंड कनेक्टिव्हिटी आहे. यात रेल्वे, रस्ते, आगामी काळात विकसित होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जलवाहतुकीद्वारे येथे ये-जा करता येणार आहे. हे उद्योगासाठी निर्यात आणि संबंधित व्यवसायाच्या दृष्टीने मोठे वरदान ठरणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकची कनेक्टिव्हिटी त्याला मिळणार आहे. गोल्ड क्राफ्टमध्ये असणार पाच सुविधा 1 -उत्पादन : यामध्ये टेस्ट-फिट ले-आऊट आणि सर्व्हिस टॅप-ऑफसह बेअर-शेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असणार आहेत.2 - क्राफ्ट आर्केड : यामध्ये कॅफे आणि जेवणाच्या पर्यायांनी पूरक किरकोळ युनिट्सची सोय असणार आहे.3- अनुषंगिक सेवा मजला : चलन विनिमय, बँका, हॉलमार्किंग सेवा, सुरक्षित व्हॉल्ट सुविधा, रंगीत खडे आणि हिरे इत्यादींच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांसह उद्यान असणार आहे.4- राहण्याची सोय : कारागिरांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर घरे देणारे तीन टॉवरचे बांधकाम येथे करण्यात येणार आहे.5- भूखंड व गाळे : गोल्ड क्राफ्टतर्फे मोठी उत्पादन युनिट्स बांधण्यासाठी रत्ने, सोने आणि दागिन्यांच्या ब्रँडसाठी भूखंड, गाळे देण्यात येणार आहेत. महापे येथे विकसित होतेय जगातील मोठे ज्वेलरी पार्क
महापे येथेही २१.३ एकर क्षेत्रावर एक लाख रोजगार देणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क बांधकामाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी २० हजार काेटींची गुंतवणूक अपेक्षित असून, एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. जगातील अत्यंत आधुनिक मशिनरींनी युक्त असे हे पार्क राहणार असून, त्याठिकाणी रत्ने आणि आभूषणे बनविणारी एक हजार युनिट्स पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहेत. येथे १४ माळ्यांच्या ९ इमारती राहणार असून, त्या एकमेकांना जोडलेल्या राहणार आहेत.