स्वस्तात सोने खरेदीला आलेल्या सोनाराला गंडवले; ४ लाख ५० हजाराची फसवणूक
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 6, 2024 05:13 PM2024-05-06T17:13:22+5:302024-05-06T17:14:07+5:30
पोलिसांच्या कारवाईचा रचला बनाव.
सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याने सोनाराची ४ लाख ५० हजाराची फसवणूक झाली आहे. तुळजापूर येथील सोनारासोबत ऐरोली परिसरात हि घटना घडली आहे. यासाठी सोनार पैसे घेऊन ऐरोलीत आला असताना पोलिसांच्या छाप्याचा बनाव करून रोकड लांबवण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर येथे राहणारे सोनार निलेश पोतदार यांच्यासोबत फ्रब्रुवारीमध्ये हि घटना घडली आहे. त्यांची सोशल मीडियाद्वारे काही व्यक्तींसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असून ते स्वस्तात विक्री करणार असल्याचे सांगितले होते.
त्यावरून हे सोने खरेदीची तयारी पोतदार यांनी दाखवली होती. यासाठी संबंधितांनी त्यांना ऐरोली परिसरात पैसे घेऊन बोलवले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून ते ४ लाख ५० हजाराची रोकड घेऊन ऐरोलीत आले होते. त्यांच्यात भेट झाली असता पोतदार यांच्याकडील रोकड घेऊन त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्यात आले होते. हे बिस्कीट खरे आहेत कि खोटे याची तपासणी करण्यासाठी ते जात असतानाच त्याठिकाणी पोलिसांचा छापा पडला. कारमधून आलेल्या व्यक्तीने ते पोलिस असल्याचे सांगून सोने विक्रीसाठी आलेल्यांना ताब्यात घेतले. शिवाय पोतदार यांनी सोने खरेदीसाठी आणलेली रक्कम देखील ते घेऊन गेले. तर पोलिसांची हि कारवाई खरी असल्याचे समजून ते दोन महिने गप्प बसले होते.
मात्र, आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे नुकतेच त्यांच्या लक्षात आले. त्यावरून शनिवारी त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.